पान एक-सिंधुदुर्ग आवृत्ती मुख्यमंत्री बातमी

पान एक-सिंधुदुर्ग आवृत्ती मुख्यमंत्री बातमी

सिंधुदुर्ग पान १

८३१९५
८३१९७
८३२७०

जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मध्यमार्ग
---
मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; वेंगुर्लेत महाअधिवेशनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ ः शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे शिक्षक महाअधिवेशनात दिले. राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, शिवाय भरतीची पद्धत सोपी केली जात आहे, असेही ते म्हणाले.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे उद्‍घाटन आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील आदी उपस्थित होते. या महाअधिवेशनाला राज्यभरातील हजारो शिक्षक उपस्थित होते. महाअधिवेशानंतर येथील नवाबाग समुद्रकिनाऱ्यावरील झुलता पूल व वेंगुर्ले शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक दोन, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘भावी पिढीच्या जीवनाला दिशा देण्याचे काम शिक्षक करीत आहेत. हे सरकार तुमचे आहे. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यात अनेक निर्णय घेतले. शिक्षक ज्ञानदानाचे काम करतो. तुमच्यावर बंधने टाकणार नाही आणि टाकू दिली जाणार नाहीत. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारी शाळांवरील विश्वास वाढत आहे. राज्यातील मुला-मुलींना समान शिक्षण मिळण्यासाठी निर्णय घेतले. दुर्गम भागातील प्रत्येकाच्या अडचणींची मला जाण आहे. मैलाचे दगड ठरतील, अशा महत्त्वाच्या निर्णयांना प्राधान्य देईन. उपमुख्यमंत्र्यांबरोबर समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. जुन्या पेन्शनमधील तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर काम सुरू आहे. तुमच्या हक्काचे सरकार आहे. जुनी पेन्शन योजना गांभीर्याने घेतली. निर्णय आणि परिणाम हे सर्वांच्या हिताचे असतील, याची काळजी घेऊ. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. थांबविलेले निर्णय घेत असल्याने हे सरकार आमचे आहे, असे प्रत्येक जण म्हणू लागला. मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, हा विश्वास तुम्हाला देतो. पळ काढण्याचे काम आमचे सरकार करणार नाही.’’
ते म्हणाले, ‘‘वेंगुर्लेमध्ये होणाऱ्या या दोनदिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल, तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाअधिवेशनातून काहीतरी चांगले घेऊन जाल. आपल्या राज्यात-देशात गुरूला फार महत्त्व आहे. आई-वडिलांनंतर गुरूंचे, शिक्षकांचे स्थान हे आयुष्यात सर्वांच्या आदराचे आहे. शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवत असतात. जसे कुंभार मातीला आकार देतो, तसेच शिक्षक हे भावी पिढी, नवीन पिढीला आकार देण्याचे, संस्कारित करण्याचे काम करीत असतात. जसे डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करीत आहेत. मी आणि उपमुख्यमंत्री मिळून या सहा-सात महिन्यांत शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले, ते राज्याचे हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्वसामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. राज्यातील घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘चंद्रपूरमधील पालडोहमधील शाळा ३६५ दिवस सुरू आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारितोषिक मिळाले. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्त्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याचा निर्णय तत्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक पिढी घडविण्याचे काम करीत असतो. त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणातही शिक्षकांनी मोठी झेप घेतली. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालकांचा व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वासही आता वाढत चालला. सरकारी शाळांतील विद्यार्थी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्सत एकूण एक हजार गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आला. यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अभिनंदन करतो. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तरुण पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.’’
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरू आहे. केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरण हे भविष्यकाळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनानेही केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिशादर्शक काम करून सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत, ती भरण्यात येतील. केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’’
शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री केसरकर म्हणाले, ‘‘या शिक्षक समिती त्रैवार्षिक महाअधिवेशनाला राज्यातील सर्व शिक्षकांना उपस्थित राहता येईल, यासाठी शासनाने तीन दिवसांची विशेष बाब म्हणून रजा मंजूर केली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. कोणीही विद्यार्थीं गणवेशाअभावी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’’
प्रास्ताविकात राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला. या वेळी आबा शिंपी यांच्या ‘स्वराज्याचं दीपस्तंभ’ आणि संदीप मगदूम यांच्या ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी वेंगुर्ला शिक्षकवृंदाने स्वागतगीत सादर केले. या वेळी राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रप्रमुखांच्या जागा
सहा महिन्यांत भरणार
केंद्रप्रमुखांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. त्या सर्व जागा शिक्षक भरती झाल्यावर येत्या सहा महिन्यांत भरल्या जातील. बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून शिक्षकांची मागणी होती. ती मागणी राज्याने पूर्ण केली आहे. मानधन १६ हजार, १८ हजार व २० हजार करण्याचा निर्णय घेतला. विविध प्रवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकांच्या वाहनावर
झळकणार ‘टीआर’?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. शिक्षकांचे समाजात फार मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम आपण करीत आहात. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात, तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरून शाळेत लवकर पोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com