बेदरकार डंपरवर नियंत्रण कोणाचे?

बेदरकार डंपरवर नियंत्रण कोणाचे?

68864

बेदरकार डंपरवर नियंत्रण कोणाचे?

वाहतुकीस धोका; दोडामार्ग तालुक्यातून रेडीपर्यंतचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः दोडामार्ग तालुक्यातून रेडी बंदरापर्यंत होणाऱ्या बेदरकार डंपर वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. काळसे (ता. मालवण) येथे भरधाव डंपरच्या धडकेत काही महिला गंभीर, तर एक ठार झाल्याच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. या वाहतुकीवर नियंत्रणाची व्यवस्था उभी करण्याची गरज ठळक झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यात गेली कित्येक वर्षे मायनिंग उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी डोंगर पोखरून काढण्यात आलेले मायनिंग रेडी पोर्टवरून परदेशात पाठवले जाते. या मायनिंगच्या वाहतुकीसाठी दोडामार्ग, बांदा, इन्सुली, वेत्ये, मळगाव, निरवडे पुढे न्हावेली, मळेवाड, शिरोडा ते रेडी या मार्गावरून एकामागून एक डंपर धावत आहेत. आजपर्यंतचा विचार करता या मायनिंग वाहतुकीत भरधाव डंपरमुळे अपघात होऊन काहींचे नाहक जीव गेले. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. करोडोमध्ये खेळणाऱ्या मायनिंगवाल्यांकडून पैशांच्या जीवावर ही प्रकरणे हातासरशी मिटवली गेली; मात्र ती रक्कम त्या कुटुंबीयांना तोकडीच ठरली. आतापर्यंतचा इतिहास पाहता अपघात झाल्यानंतर अनेक आंदोलने, विरोध झाला, पण हा विरोध तात्पुरता होता. मायनिंगवाल्यांकडून आवाज उठविणाऱ्या प्रत्येकाची तोंडे गप्प करण्यात आली. त्यामुळे आजही मायनिंग वाहतुकीची टांगती तलवार कायम आहे.
जिल्ह्याचे प्रशासन मायनिंग समर्थकच असल्याप्रमाणे वागत आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कळणे मायनिंग वाहतुकीत आवश्यक असलेल्या उपाययोजना कुठेच दिसून येत नाहीत. नेहमीप्रमाणे ग्रामस्थांचा विरोध झाल्यानंतर दिखाव्यापुरती प्रशासनाकडून कडक भूमिका घेतली जाते. नंतर ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’, अशा भूमिकेत प्रशासन वावरत आले आहे. मुळात मायनिंग वाहतकीसाठी जे नियम आखून देण्यात आले आहेत, त्या नियमांचे रीतसर पालन होते काय, हे कधी पाहण्याची तसदी प्रशासन घेत नाही. एकूणच काळसे येथे झालेल्या डंपर अपघाताची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत असल्याचेच दिसून येत आहे.
सद्यस्थितीत दोडामार्ग ते रेडी या मार्गावर भरधाव मायनिंगचे डंपर धावत आहेत. ज्या दिवसापासून ही वाहतूक सुरू झाली, त्या दिवसापासून वाहतुकीच्या नियमावलीचे पालन होताना कुठेच दिसून आले नाही. यापूर्वी रस्त्यावर ठिकठिकाणी मायनिंगवाल्यांकडून सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते; मात्र यावर्षी काही ठराविक ठिकाणे सोडता अपघातासारख्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुळात डंपर वाहतुकीला ब्रेक लागणे गरजेचे आहे. काही ठराविक अंतर सोडून डंपर वाहतूक होणे गरजेचे आहे; मात्र हे नियम डंपर चालकांनी धाब्यावर बसविल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे भरधाव मायनिंग वाहतूक कोणाच्यातरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मायनिंग वाहतुकीच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी सुरक्षारक्षक आजही आवश्यक आहे. प्रत्येक जोडरस्त्यांवर हे सुरक्षारक्षक तैनात होते; मात्र आता सुरक्षारक्षक त्या ठिकाणी नसल्याने मायनिंग वाहतूक सुसाट सुरू आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक तैनात आहेत, त्यांना डंपर चालक जुमानत नसल्याचेही दिसते. त्यामुळे यावर बंधन गरजेचे आहे.
.................
चौकट
मद्यपी चालकांवर नियंत्रण आवश्यक
मायनिंग वाहतूक करणारे डंपर चालक बहुधा परप्रांतीय असतात. हे परप्रांतीय चालक बहुतेक वेळा मद्यपान करूनच डंपर चालवत असतात. अशा चालकांना डंपर मालक व पोलिस यंत्रणा पाठीशी घालत आल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक जीव गमावा लागतो. मद्यपान करणाऱ्या डंपर चालकांवर पोलिसांकडून सक्षम यंत्रणा उभारून कारवाई होणे आवश्यक आहे.
.................
चौकट
भरधाव डंपरवर प्रशासनाचे दुर्लक्ष
रेडी मायनिंग वाहतूक मार्गावर अनेक गावे येतात. सद्यस्थितीत भरधाव धावणाऱ्या डंपरला आवर घाला, असा सूर गावागावांतून येत आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एरव्ही भरधाव वाहतूक किंवा नियम तोडणाऱ्या इतर वाहन चालकांवर कारवाई केली जाते, मात्र मायनिंगच्या वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्या बेदरकार मायनिंग वाहतुकीवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---
मायनिंग वाहतुकीबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. वेळप्रसंगी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते; मात्र अजूनही काही त्रुटी असल्यास किंवा तक्रारी आल्यास उपाययोजना केल्या जातील.
- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com