
वागदे येथे महामार्गावर अपूर्ण रस्त्यामुळे अपघात
वागदे येथे महामार्गावर
अपूर्ण रस्त्यामुळे अपघात
दोन मोटारींची धडक; प्रवाशी बचावले
कणकवली, ता. १७ : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे डांबरीकरण न झालेल्या ठिकाणी पुढे जाणाऱ्या मोटारीला मागून येणाऱ्या मोटारीची धडक बसली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. आपसात तडजोडीने हे प्रकरण मिटविण्यात आले.
महामार्ग चौपदरीकरण होत असताना वागदे उभादेव मंदिरा समोरील दीडशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले नव्हते. जमीन मोबदला न मिळाल्याने त्यावेळी हे काम जमीन मालकांनी रोखून धरले होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला. त्यामुळे येथील जमीन मालकांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला असलेला विरोध मागे घेतला. त्यानंतर महामार्ग विभागाने मातीचा थर टाकून येथील महामार्ग वाहतुकीस खुला केला. पावसाळ्यात येथील रस्त्याची माती वाहून गेल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा या ठिकाणी कमी केली जाते. वेंगुर्ले येथील अधिवेशन आटोपून परजिल्ह्यातील शिक्षक मोटारीने महामार्गावरून जात होते. यात वागदे येथे खड्डेमय रस्ता आल्याने एका चालकाने मोटारीची गती कमी केली; मात्र त्याचा अंदाज पाठीमागून येणाऱ्या मोटार चालकाला आला नाही. त्यामुळे त्या मोटारीची पुढच्या मोटारीला धडक बसली. यात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले; मात्र या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात झाली नाही. दोन्ही चालकांनी आपसात समजुतीने वाद मिटवला; मात्र दीडशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.