शिवजयंती महोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती महोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज
शिवजयंती महोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज

शिवजयंती महोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज

sakal_logo
By

49216

शिवजयंती महोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज

जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळमध्ये शिवजयंती
कुडाळ ः येथील सकल मराठा समाजाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्या (ता.१९) शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन मावळे सकाळी साडेदहाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडे येतील. त्यानंतर शिवज्योतीचे मिरवणुकीसह जिजामाता चौकात आगमन होईल व शिवजन्म सोहळा साजरा होईल. पाळणा गाऊन महाराजांच्या जन्मोत्सवाचा शुभारंभ होईल. या सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित असेल. त्यानंतर राजमाता जिजाऊना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजनगरमध्ये महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल व दर्शनासाठी शिवज्योत तेथे ठेवली जाईल. सायंकाळी सहाला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये शिवचरित्रावर आधारीत नृत्याविष्कार, नाटिका व मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम कुडाळ जिजामाता चौक ह्या ठिकाणी होणार आहेत. या उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाजाकडून केले आहे.
---------
निरुखेत शिवज्योत रॅली
कुडाळ ः निरुखे(ता.कुडाळ) येथे शिवजयंतीनिमित्त उद्या (ता.१९) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी नऊला शिव प्रतिमा पूजन, सकाळी दहाला शिवज्योत रॅली (निरुखे पांग्रड ग्रामस्थांची संयुक्त) रांगणागड पायथा, पांग्रड ते श्री देव रवळनाथ मंदिर निरुखेपर्यंत सायंकाळी ५ ते ८ वाजता विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पहिली ते दहावी वकृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. निरुखे, पांग्रड भडगाव शाळेतील मुलांचा पोवाडा, गोंधळ नृत्य, ऐतिहासिक नृत्य सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन निरुखे ग्रामस्थांतर्फे केले आहे.
--
लिंगेश्वर विद्यालय
कुडाळ ः तुळसुली येथील शिव प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्सव उद्या (ता.१९) लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रंगमंचावर होणार आहे. यानिमित्त सकाळी दहाला शिवप्रतिमेस पुष्पहार, पूजा, पोवाडा, शिवआरती, ११ वाजता सुदृढ बैल स्पर्धा होणार आहे. लहान व मोठा गट अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना पैठणी व पारितोषिके देण्यात येतील. सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, वेशभूषा स्पर्धा (मुले-मुली संयुक्त) शिवचरित्रावर आधारित कोणत्याही पात्राची वेशभूषा व त्या अनुषंगाने किमान तीन मिनिटे वक्तृत्व ०१ ते १२ वर्षे वयोगट, १८ वर्षावरील वयोगट : प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता संदीप बुवा मांडके (जेजुरी) यांचे शिवचरित्रावर आधारित ‘अफजल खानाचा वध’ हे कीर्तन सादर होणार आहे.
--
कुडाळ-नाबरवाडी
कुडाळ ः नाबरवाडी येथील साई कला-क्रीडा मंडळ आणि नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने नाबरवाडी येथे उद्या (ता.१९) शिवजयंतीचे आयोजन केले आहे. सकाळी नऊला शिवज्योतीचे आगमन, दहाला शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी तीनला मुलांसाठी क्रीडा स्पर्धा लहान गट (४ ते ८ वर्षे) व मोठा गट (८ ते १४ वर्षे), सायंकाळी पाचला महिलांसाठी खेळ तसेच सातला रेकॉर्ड डान्स स्पर्धा दोन गटांत होणार आहे. लहान गट (१५ वर्षांखालील) : पारितोषिके प्रथम क्रमांक २ हजार रु., द्वितीय १५०० रु., तृतीय ५०० रु., मोठा गट (१६ वर्षांवरील) प्रथम क्रमांक ३ हजार रु, द्वितीय २ हजार रु., तृतीय १ हजार रु. इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
मळगाव-भिल्लवाडी
सावंतवाडी ः मळगाव-भिल्लवाडी ग्रुप व शिवप्रेमी ग्रामस्थ यांच्यावतीने उद्या (ता.१९) शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे पाचला फुकेरी हनुमंतगड ते मळगावपर्यंत मशाल रॅली, सकाळी साडेआठला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर अभिषेक, दुपारी अडतीच ते साडेचार दुचाकी रॅली व ढोलताशा पथक, सायंकाळी पाचला मर्दानी खेळ लेझीम नृत्य, वेशभूषा व नृत्यादी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी साडेसहाला प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन, साडेसातला स्नेहभोजन, रात्री सुयोग कलामंच, करमळी गोवा यांचा ‘शिव आलिंगन’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
---
पाडलोस
सावंतवाडी ः पाडलोस गाव ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाडलोस ग्रामस्तरीय महिलांसाठी शिवजयंती उत्सवानिमित्त उद्या (ता.१९) कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी साडेआठला महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मुलांची भाषणे, हळदीकुंकू, महिलांच्या स्पर्धा, श्री देव रवळनाथ मंदिर येथे जल्लोष २०२३ व पारितोषिक वितरण, रात्री सातला मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.