अपहरणाचा बनावच असल्याचे उघड

अपहरणाचा बनावच असल्याचे उघड

प्रार्थना पाठ न झाल्याने अपहरणाचा बनाव

विद्यार्थ्यांचा प्रताप; सावडाव प्रकरणातील विसंगती उघड


कणकवली, ता.१८ : सावडाव (ता. कणकवली) येथील सहा विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा तो बनाव असल्‍याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. शाळेत विद्यार्थ्यांना दिलेली प्रार्थना पाठ न झाल्‍याने अपहरणाची कथा रचण्यात आली, मात्र पोलिस तपासात या कथित अपहरणातील विसंगती उघड झाल्या. दरम्‍यान, शालेय विद्यार्थी अपहरणाचा तो बनाव असल्‍याने निष्पन्न झाल्‍याने जिल्ह्यातील पालकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर झाले.
सावडाव येथील विद्यार्थी अपहरण प्रयत्नाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती; मात्र विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणातील गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांनी केलेल्या तपासात घटनाक्रम व पुरावे पाहिल्यानंतर पोलिसांनी हे कोडे उलगडले. तो अपहरणाचा प्रकार अखेर विद्यार्थ्यांनीच केलेला बनाव असल्याचे पोलिस तपासाअंती सिद्ध झाले. शाळेत सांगितलेली प्रार्थना पाठ न झाल्याने हा बनाव रचल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले आहे. तसेच तुमची मुले सुरक्षित आहेत. पालकांनो अजिबात घाबरू नका, असा विश्वासही पोलिसांनी जनतेला दिला आहे.
सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सावडाव शाळेतील सहा मुलांना एका वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे आणि त्यांच्या तावडीतून आपण पळून आल्याचे संबंधित मुलांनी सांगितले होते. या घटनेनंतर पोलिसांसह इतर प्रशासनही कामाला लागले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावडाव येथे भेट दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी याबाबत कसून तपास केला. त्यासाठी सावडावकडे जाणाऱ्या मार्गावरील शक्य होतील तेवढे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले होते; मात्र त्या दरम्यान सावडावकडे जाणारे कोणतेही संशयित वाहन आढळले नव्हते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या तपासात पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुपकुमार खडे, कृष्णा केसरकर, तसेच पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व कणकवली पोलिसही यात सहभागी झाले.
--
विद्यार्थ्यांचा असा खटाटोप
पोलिसांनी तांत्रिकदृष्टीनेही तपास केला. विद्यार्थी ज्या ठिकाणी घटना घडल्याचे सांगत होते, तेथील व इतर ठिकाणच्याही पाऊलखुणाही तपासण्यात आल्या. विद्यार्थी सांगत असलेली घटना व क्रम याचाही ताळमेळ लागत नव्हता. अखेर पोलिसांनी खोलवर जाऊन चौकशी केली असता सदरच्या मुलांना शाळेत एक प्रार्थना पाठ करण्यासाठी शिक्षकांनी सांगितली होती; मात्र प्रार्थना पाठ न झाल्याने आपल्याला ओरडतील इतर विद्यार्थ्यांसमोर आपला कमीपणा होईल, या भीतीने या मुलांनी हा बनाव रचल्याचे पोलिस तपासात पुढे आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com