चिपळूण ः चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेस ग्रीन सिग्नल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेस ग्रीन सिग्नल
चिपळूण ः चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेस ग्रीन सिग्नल

चिपळूण ः चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेस ग्रीन सिग्नल

sakal_logo
By

चिपळूणच्या ‘ग्रॅव्हिटी’
पाणी योजनेस ग्रीन सिग्नल

तांत्रिक मंजुरी; कोळकेवाडी धरणातून पाणी

चिपळूण, ता. १८ ः चिपळूण शहरासाठी कोळकेवाडी धरणातून पाणी पुरवणाऱ्या ‘ग्रॅव्हिटी’ नळपाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्याने पाणीयोजना साकारण्याची चिन्हे आहेत. सुमारे १३५.५६ कोटींच्या ही पाणी योजना तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाकडे सादर केली होती. या योजनेला लवकरच मंजुरी मिळवून देऊ, असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबर महिन्यात दिला होता.
मंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चिपळूणच्या पहिल्याच दौऱ्यात कोळकेवाडी धरणातून शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेच्या पाठपुराव्याचा उल्लेख केला होता. त्याशिवाय पालिकेच्या इमारत बांधकामासाठी २७ कोटी रुपये, नगरोत्थानमधून साडेचार कोटी, गोविंदगड सुशोभीकरणासाठी आराखड्याप्रमाणे आवश्यक निधी व शहरातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आवश्यकतेनुसार शंभर ते दोनशे कोटी रुपये देणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी जाहीर करत चिपळूणवर कोट्यवधी रुपयांची बरसात केली होती. त्याचवेळी संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचनादेखील प्रशासनाला दिली होती.
त्याप्रमाणे प्रशासनाने ग्रॅव्हिटी पाणीयोजनेचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी सादर केला होता. योजनेचा परिपूर्ण प्रकल्प अहवाल अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पनवेल यांनी सादर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने प्रकल्प अहवालातील कामांची किंमत १३५.५६ कोटी रुपये केली आहे. प्रकल्पाच्या १३५ कोटींच्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी काही अटी व शर्तीही लागू करण्यात आल्या आहेत.