
खेड ः कोंडीवलीमधील न्यायप्रविष्ट असलेल्या समाध्यासह अतिक्रमण जागेचे सपाटीकरण
rat18p14.jpg
83646
खेडः कोंडीवली येथे सपाटीकरण करण्यात आलेली जागा उपोषणाला बसलेले कोंडीवली ग्रामस्थ.
---------
न्यायप्रविष्ट जागेचे समाध्यासह सपाटीकरण
स्मशानभूमीचा वाद ; कोंडीवलीमधील ग्रामस्थांचे उपोषण सुरू
खेड, ता. १८ः तालुक्यातील कोंडीवली बौद्धवाडी येथे जुन्या स्मशानभूमीचा वाद न्यायप्रविष्ट असताना आता या जागेवर येथील ग्रामपंचायतीकडून जुन्या स्मशानभूमीत असलेल्या समाधीस्थळावर जेसीबीच्या साहाय्याने रातोरात सपाटीकरण केल्याचा आरोप केला आहे. या जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्याचा दावा करत येथील ग्रामस्थांनी बसपा कार्यकर्त्यांसोबत येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखलच घेतली नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
कोंडीवली बौद्धवाडी येथील जुन्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले असल्याचा वाद तहसीलदार कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीन असून तो न्यायप्रविष्ट बनलेला आहे. या प्रकरणी येथील ग्रामस्थांनी व बसपाच्या कार्यकर्त्यानी अनेक आंदोलने छेडून काही अंशी न्याय मिळाला आहे; मात्र अजूनही वाद सुरू असताना आता या वादाला नवीन तोंड फुटले आहे. दरम्यान, वादग्रस्त जागेवर एका कार्यक्रमासाठी जागेचे सपाटीकरण करण्यात येऊन जुन्या स्मशानभूमीमधील समाध्या जाणीवपूर्वक नष्ट केल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत उपोषण सुरू केले आहे; मात्र आंदोलनाची दखल अद्यापी येथील प्रशासनाने घेतलेली नसल्याचे आंदोलनकर्ते ग्रामस्थ व बसपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.