पाऊलखुणा - राजमाता पार्वतीदेवींनी घेतला अखेरचा श्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊलखुणा - राजमाता पार्वतीदेवींनी घेतला अखेरचा श्‍वास
पाऊलखुणा - राजमाता पार्वतीदेवींनी घेतला अखेरचा श्‍वास

पाऊलखुणा - राजमाता पार्वतीदेवींनी घेतला अखेरचा श्‍वास

sakal_logo
By

पाऊलखुणा ः भाग - १०९

swt१९१.jpg
L83794
राजमाता पार्वतीदेवी.

swt१९२.jpg
83795
राजपरिवारासमवेत राजमाता पार्वतीदेवी.

राजमाता पार्वतीदेवींनी दाखवली प्रजाहितदक्ष कार्यपध्दतीची चुणूक
- शिवप्रसाद देसाई
लीड
राजमाता पार्वतीदेवी यांना आमदार म्हणून फार कमी कारकीर्द मिळाली. या अल्पावधीतही त्यांनी आपल्या प्रजाहितदक्ष कार्यपध्दतीची चुणूक महाराष्ट्राला दाखविली. विकासाची अनेक स्वप्ने पूर्ण करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. हळूहळू वयोमानानुसार त्यांची प्रकृती साथ देईना. यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
--------------
राजमाता पार्वतीदेवी या खरंतर विधिमंडळात श्रीमंत शिवरामराजे यांच्या राजकीय करिअरच्या अगदी उंबरठ्यावर आमदार झाल्या होत्या. अपरिहार्य परिस्थितीमुळे त्यांना निवडणुकीच्या राजकारणात उतरावे लागले होते. असे असले तरी त्या विधिमंडळात लोकांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडायच्या.
मतदारांशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्‍न समजून घेण्यावर त्यांचा भर असायचा. रिजंट म्हणून काम करत असताना लोकांशी त्यांचा थेट संपर्क होताच, आता आमदार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांचे त्या प्रतिनिधित्व करत होत्या. अर्थात राज्यकारभाराची पध्दत पूर्ण बदलली होती. राजमाता विरोधी पक्षात होत्या. त्या काळात काँग्रेसचे सरकार होते. तरीही त्या लोकशाहीतील नव्या तंत्रानुसार लोकांचे प्रश्‍न मांडून ते सोडवण्यावर भर देत होत्या. त्यांनी विधिमंडळातील आपल्या अनुभवांबाबत लोकांना आवाहन केले होते. त्यावरून त्यांची कार्यपध्दती अधिक ठळकपणे दिसते. विधिमंडळाचे कामकाज आटोपून मतदारसंघात आल्यावर त्यांनी हे निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, "आधी मी मतदारांची क्षमा मागते. कारण निवडणुकीनंतर मतदारसंघात फिरणे शक्य झाले नाही. यातही माझा नाईलाज होता. माझी प्रकृती चांगली नसल्याने मनात असूनही पुष्कळदा अनेक गोष्टी करणे अशक्य होते. ही स्थिती जाणून मतदार मला क्षमा करतील, असा विश्‍वास आहे. आमदार झाल्यापासून मतदारांकडून अनेक वैयक्तिक, सार्वजनिक स्वरुपाची पत्रे मला आली. यातील काहींच्या बाबतीत कोणाही आमदाराला काहीही करणे शक्य नाही. तरीही मतदारांच्या समजूतीसाठी हस्ते-परहस्ते जे होईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सार्वजनिक स्वरुपाच्या पत्रामध्ये दिलेली माहिती अपुरी असते. तिच्या आधारावर विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित करायला मर्यादा येतात. यामुळे मतदारांनी वेळोवेळी अधिकृत आणि खरी माहिती पुरवावी. यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. आपणाला माहितीच आहे की, आज मुंबई विधिमंडळात काँग्रेस पक्षाला बहुमत आहे. मी समिती पुरस्कृत स्वतंत्र उमेदवार आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीला अधिकृत विरोधीपक्ष म्हणून विधिमंडळात मान्यता मिळाली आहे. असे असले तरी काँग्रेसचे हुकमी बहुमत असल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी स्वतंत्र असे कार्य करणे कठीण आहे. तरीही विरोधी पक्ष विधिमंडळात चांगली कामगिरी करत आहे. सत्ताधारी विरोधी आमदारांच्या प्रश्‍नांना अनेकदा उडवाउडवीची उत्तरे देतात. याचेच उदाहरण म्हणजे, आरोग्य खात्याच्या मागण्यांबाबत विधिमंडळात मी प्रश्‍न उपस्थित केले, त्याचे देता येईल. सावंतवाडी येथील रुग्णालयात रोगाच्या निदानासाठी उपलब्ध असलेली साधने का नाहीशी केली, असा सवाल मी विचारला. याला मंत्रिमहोदयांकडे उत्तर नव्हते. यामुळे पळवाट म्हणून त्यांनी ''ही साधने होती; परंतु त्याचा वापर खास करून राजघराण्यातील मंडळींसाठी होत होता,'' असे उत्तर दिले. सावंतवाडी येथील रुग्णालयात उपलब्ध साधनांचा राजघराण्यासाठी किती उपयोग होत होता, हे मी माझ्या प्रजेला सांगायला पाहिजेच असे नाही. हॉस्पिटलचे रेकॉर्डच याची ग्वाही देईल. विधिमंडळातील अल्पावधीच्या वास्तव्याचे माझे अनुभव मतदारांसमोर ठेवले आहेत. यावरून एकंदर परिस्थितीची मतदारांना जाणीव होईल, अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीतही माझ्याकडून होईल ते कार्य करायचा मी प्रयत्न करीन. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक प्रखर होण्याची चिन्हे आहेत. पुढील निवडणुकीपूर्वी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा माझा विश्‍वास आहे. फक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपुरता समितीचा व माझा संबंध आहे. मी स्वतंत्र आमदार आहे आणि अखेरपर्यंत राहण्याचा माझा निर्धार आहे."
विधिमंडळातील त्यांच्या या अनुभवावरून लोकांसाठी काम करण्याची त्यांची कळकळ, विरोधी पक्षात असल्याने येणार्‍या मर्यादांमुळे त्यांना वाटणारी अस्वस्थता अगदी प्रकर्षाने जाणवते. या सगळ्या प्रवासात त्यांची प्रकृती मात्र साथ देत नव्हती. त्यांच्या या अखेरच्या दिवसांचे वर्णन त्यांच्या कन्या राजकुमारी सत्यवतीराजे अर्थात श्रीमंत संयोगिता घाटगे यांनी लिहून ठेवले आहे. या संदर्भानुसार, विलीनीकरणानंतर बराचकाळ राजमाता हिंडलगा (बेळगाव) येथील बंगल्यावर रहायला असायच्या. सर्व राजकन्यांची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना एकटे वाटू लागले होते. दरवर्षी सगळ्या मुली मे महिन्यामध्ये त्यांना भेटायला यायच्या. त्यांना एक हार्ट अ‍ॅटॅक आला. यामुळे त्यांच्या प्रकृतीत बराच बदल झाला. त्यांनी क्लबमध्ये जायचे बंद केले. तरीही त्या घरीच ब्रिज खेळायच्या. ''माजाँग'' हा चायनीज खेळही त्या बेळगावमधील सैन्य अधिकार्‍यांच्या बायकांकडून शिकल्या होत्या. याच दरम्यान श्रीमंत शिवरामराजे यांचे लग्न झाले. मुलाच्या संसारात त्या रमल्या. त्यांचा वेळ चांगला जाऊ लागला; मात्र दुसर्‍या हार्ट अ‍ॅटॅकमुळे त्या खूप खंगल्या. त्यावेळी त्या ऑक्सिजनवर होत्या. पुढे यातून सावरल्यावर त्या सगळीकडे व्हीलचेअरवरून फिरायच्या. सिनेमा पाहण्याची आवड या स्थितीतही त्यांनी जपली. व्हीलचेअरवरून थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमा पाहत असत. त्यांनी या काळात आपल्या कन्येला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की, "मला बरोबर दिसत नाही. कारण डायबेटीसमुळे माझ्या डोळ्यावर पडदा आला आहे." यानंतर पायांचे दुखणे सुरू झाले. दिसायचे कमी झाल्यावर आपल्या मुलींना पाठवायची त्यांची पत्रेही बंद झाली. कधीकधी त्या त्यांना फोन करायच्या. १९६१ च्या जूनमध्ये सावंतवाडीमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्या आजारीच होत्या. सावंतवाडीला दिलेली त्यांची ही शेवटची भेट. ६ ऑगस्ट १९६१ ला अचानक त्यांचे निधन झाले. सावंतवाडीकरांसाठी हा खूप मोठा धक्का होता. राजमातांनी आपले अख्खे आयुष्य सावंतवाडीच्या प्रजेसाठी खर्च केले. अनेक त्याग, दुःखाचे मोठे धक्के पचवून त्या मोठ्या धीराने प्रजेच्या हितासाठी लढल्या. शेवटपर्यंत त्यांची ही लढाई सुरूच होती.
..............
चौकट
कामाची पोचपावती
राजमाता पार्वतीदेवी यांच्या निवडणुकीच्या राजकारणातील सक्रिय साक्षीदार असलेले माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार (कै.) जयानंद मठकर यांनी राजमातांबद्दल मला काही वर्षापूर्वी सांगितलेले अनुभव त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची समजून घ्यायला पुरेसे आहेत. पुढच्या काही वर्षांत श्री. मठकर विधानसभेच्या राजकारणात सक्रिय झाले. यातूनच त्यांची एकदा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी चर्चा झाली होती. यावेळी वसंतरावांनी सांगितले होते की, ''राजमाता खूप हुशार होत्या. त्यांची विधानसभेतील सर्वच भाषणे अत्यंत अभ्यासपूर्व असायची. त्या परत निवडून आल्या असत्या तर त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळाले असते.''
....................