शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे

शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे

कोकण आयकॉन
............
शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे

३ जून १९४० मध्ये दादांनी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बालमोहन विद्यामंदिराची स्थापना केली. आठ मुले व चार शिक्षक घेऊन सुरू झालेल्या विद्यामंदिरात मुलांची संख्या तेराशेपर्यंत गेली व त्रेपन्न शिक्षक त्यांच्यावर संस्कार करू लागले. शाळेची प्रगती वेगाने होत गेली. बालमोहन विद्या मंदिरातील मुलांनी सर्वात जास्त संख्येने शासकीय शिष्यवृत्ती मिळवाव्यात, ही नेहमीची गोष्ट झाली. या सर्व यशाला पोषक असे निरोगी वातावरण शाळेत दादांमुळे असायचे, ते आजही आहे.
- सतीश पाटणकर
................
शिवराम दत्तात्रेय उर्फ दादासाहेब रेगे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावात एका गरीब, कुटुंबात झाला. १९१२ मध्ये कोचरे गावात सरस्वती विद्यामंदिर येथे ते पहिलीत दाखल झाले. १९२१ मध्ये ते व्हर्नाक्युलर फायनल (सातवी) झाले. १९ जुलै १९२१ पासून दादांनी हेदूल लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली, पण मुलांना मारीत नाहीत म्हणून पेंडूर गावी त्यांची बदली करण्यात आली. आधीच्या शाळेत जंगलातील मुलांना, तर या शाळेत शेतकरी मुलांना ते शिकवू लागले. या मुलांकडूनही ते खूप काही शिकले.
गावातील नोकरी सोडून दादा मुंबईला आले. ६ सप्टेंबर १९२३ पासून ते माटुंग्याच्या डेव्हिड ससून इंडस्ट्रिअल अँड रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये लहान मुलांच्या तुरुंगात शिक्षक म्हणून काम करू लागले. शाळेवर सरकारची देखरेख असे. शाळेपासून जवळच शिक्षकांच्या राहण्याची सोय होती. व्यवसाय शिक्षणाबरोबरच मराठी, उर्दू, गुजराती व थोडे इंग्रजी येथे शिकवले जाई; पण मुलांना सुधारण्याच्या प्रयत्नांऐवजी त्यांना गुन्हेगार समजून कठोर शिक्षा केल्या जात. दादांनी या मुलांशी प्रेमाने बोलून, आपुलकीने मुलांना बोलते करून त्यांच्याशी दोस्ती केली. चांगल्या सवयी लावल्या. १९२६ मध्ये त्यांनी जलद इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण केला. खेळ, स्पर्धा, सहली, बागकाम असे अनेक उपक्रम शाळेत सुरू झाले. मुलांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण झाली. विड्या फुंकण्याची मुलांची सवय कमी झाली. अधिकाऱ्यांशी बोलून दादांनी शाळेस पोलिसी वातावरणातून, दहशतीतून मुक्त केले. दादांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक मुलांचे उच्चार सुधारले, त्यांना तोंडी हिशेब शिकविले. फळ्याचा खूप उपयोग करून त्यांचे अक्षर सुधारले. त्यामुळे ते मुलांचे आवडते शिक्षक झाले. १९३३ मध्ये सातवीच्या परीक्षेत अकराही मुले पास झाली. दादांचे प्रयोग सफल झाले. त्यांनी स्काऊट मास्तरचे ट्रेनिंग घेतले. शाळेत बनबरी स्काऊट ट्रूप सुरू केला. तुरुंगातील मुले इतर मुलांसारखीच असतात, हे दादांनी सिद्ध केले.
१९३९ मध्ये प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दादांनी ही नोकरी सोडली. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी त्यांचे घर गहाण पडले. छोटेछोटे व्यवसाय त्यांनी केले; पण त्यांच्या जीवनात रिफॉर्मेटरी स्कूलचे स्थान फार वेगळे होते, हे सतत त्यांना जाणवत राहिले. ट्रेनिंग झाल्यानंतर ३ जून १९४० मध्ये दादांनी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बालमोहन विद्यामंदिराची स्थापना केली. १९४० मध्ये आठ मुले व चार शिक्षक घेऊन सुरू झालेल्या विद्या मंदिरात मुलांची संख्या तेराशेपर्यंत गेली व त्रेपन्न शिक्षक त्यांच्यावर संस्कार करू लागले. शाळेची प्रगती वेगाने होत गेली. बालमोहन विद्या मंदिरातील मुलांनी सर्वात जास्त संख्येने शासकीय शिष्यवृत्ती मिळवाव्यात, ही नेहमीची गोष्ट झाली. माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पंचवीस वर्षांत ६३ मुले चमकली. या सर्व यशाला पोषक असे निरोगी वातावरण शाळेत दादांमुळे असायचे, ते आजही आहे. मुलांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, व्यावहारिक व सांस्कृतिक विकास घडविणारे अनेक उपक्रम त्यांनी शाळेत सुरू केले. मुलांना शाळेविषयी आत्मीयता वाटावी म्हणून ''बालदिन'' हा सर्व मुलांचा सामुदायिक वाढदिवस म्हणून येथे साजरा होतो. कुलपद्धतीद्वारा स्वच्छता, शिस्त, सजावट, वक्तृत्व, सेवा, स्वावलंबन यांचे संस्कार मुलांवर होत असतात. क्रीडा स्पर्धांना विशेष महत्त्व आहे.
विद्या मंदिरात ''प्रज्ञाशोध'' परीक्षेसाठी खास वेगळी तयारी अनेक वर्षे करून घेतली जाते. शाळेबाहेरील विविध परीक्षांना मुले बसतात व यशस्वी होतात. या सर्व परंपरा दादांनी सुरू केल्या. सुटीचा सदुपयोग कसा करावा, ह्या संबंधीचे मार्गदर्शनपर पत्रक तयार करून दादा ते मुलांना देत असत. दादांनी शिक्षणविषयक लेखन केले, गणिताची पुस्तके लिहिली, आकाशवाणीवर शैक्षणिक कार्यक्रम दिले, दूरदर्शनवर अनुभव कथन केले. दादासाहेब रेगे ह्यांच्या कार्याचा १९६२ मध्ये आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला. ८ जून १९८२ मध्ये त्यांचे निधन झाले.

(लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com