कोकणातील ''शिववाटा'' आता पुस्तकरुपात

कोकणातील ''शिववाटा'' आता पुस्तकरुपात

swt1910.jpg
83834
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अॅड. संतोष सावंत.


कोकणातील ‘शिववाटा’ आता पुस्तकरुपात
कोमसापचा संकल्पः सावंतवाडी शाखेतर्फे जयंतीनिमित्त मानवंदना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः कोकणातील छत्रपती शिवरायांचे वास्तव्य आणि गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा लक्षात घेता कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे वर्षभरात शिवरायांच्या कोकणातील वाटांचा इतिहास अर्थात ‘शिववाटा’ पुस्तक स्वरुपात मांडण्याचा संकल्प आज शिवजयंतीदिनी करण्यात आला.
कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे शिवजयंती उत्सव येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पाळणा सजवून त्यामध्ये शिवरायांचे शिवपुस्तक ठेवून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाऊन जन्मदिन साजरा करण्यात केला. शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी अर्पण केला.
यावेळी अॅड. सावंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदारांच्या माध्यमातून शिवराज्य निर्माण केले. कोकणातील गावागावांच्या मातीला शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे. त्या शिववाटा स्वराज्याच्या साक्षीदार आहेत; मात्र याबाबतचा इतिहास म्हणावा तसा पुस्तकरुपातून अथवा जनजागृतीच्या माध्यमातून आजच्या पिढीसमोर आला नाही. त्यामुळे सावंतवाडी कोमसापच्या माध्यमातून हा इतिहास पुस्तकरुपात उभा केला जाईल. पुढील शिवजयंतीला कोकणातील शिवरायांच्या वाटा हे पुस्तक सादर करण्यात येईल. त्यासाठी इतिहास संशोधकांचेही सहकार्य घेण्यात येईल. या माध्यमातून नव्या पिढीसमोर शिवजागर अभियान राबविण्यात येईल.’’
जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा होते. त्यांचे पर्यावरण, आरोग्य आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांची साहित्य चळवळ मोठी होती. हीच साहित्य चळवळ आपण पुढे नेत आहोत, असे सांगितले. भरत गावडे यांनी जाणता राजा शिवाजी महाराजांचे स्मरण आणि आचरण आपण प्रत्येकाने करायला हवे, असे आवाहन केले. तालुका सहसचिव राजू तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील वास्तव्य आणि त्यांनी ज्या पद्धतीने इतिहास रचवला, युद्धनीती वापरली, ती युद्धनीती आजही भारतीय सैन्यदलात आणि अमेरिकेतही वापरली जाते, अशी माहिती दिली. कोकणातील त्यांचे वास्तव्य साहित्य स्वरुपात मांडणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. दीपक तुपकर, अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, अनिल गोवेकर, आत्माराम परब, मनीष नाईक, प्रसाद परब, धैर्यशील परब आदी उपस्थित होते. यावेळी शाळकरी मुलाला छत्रपती शिवरायांच्या बालपणीच्या आठवणींचे पुस्तक भेट देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com