संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ संक्षिप्त


लांजा तालुका खरेदी-विक्री
संघाच्या अध्यक्षपदी घारे
लांजा ः लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी परवेश घारे तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर तेंडुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक जानेवारीत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवसहकार पॅनेलने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी अध्यक्षपदासाठी परवेश घारे तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार राजन साळवी यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्‍यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी शिवसहकार पॅनलचे प्रमुख चंद्रकांत शिंदे, गणेश लाखण यांच्यासह संचालक सुरेश साळवी, केशव कुपटे, महादेव खानविलकर, मोहन घडशी, संदीप दळवी, सुभाष पवार, सुभाष लाखण, उमेश तोडणकर, राहुल शिंदे, सायली तोडकरी, धनिता चव्हाण, संतोष बेनकर, गुरूप्रसाद तेली, शरद चरकरी उपस्थित होते.


समृद्धी महामार्गाप्रमाणे
रिफायनरी मार्गी लावणार
फडणवीस; रिफायनरीला विरोधामुळे नुकसान
राजापूर ः नाणार रिफायनरीची जागा बदलली असली तरी तेथील १० हजार एकर जमिनीची सहमती मिळाली आहे. बारसू येथे सध्या ट्रायलफिटचे काम सुरू असले तरी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारात रिफायनरी पूर्ण करूच, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. समृद्धी महामार्ग जसा लोकशाही मार्गाने विरोध दूर करत १०० टक्के लोकांना सोबत घेऊन पूर्ण केला तसाच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणार, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे ३ लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपल्या तीन कंपन्यांचा सहभाग आहे. या प्रकल्पामुळे कोकणचेच नव्हे तर देशाचे चित्र बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रिफायनरीला विरोध केल्याने कोकणच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाचं मोठं नुकसान झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाणार रिफायनरीचा आंबा उत्पादनावर परिणाम होईल असं सांगितलं गेलं; पण देशातील सर्वात मोठी रिफायनरी गुजरातमध्ये रिलायन्सची आहे. तेथे मोठ्या प्रमाणात आंबा होतो. मासेमारीवर परिणाम होईल, असा खोटा प्रचार केला गेला. रिफायनरी प्रकल्प कोकणात झाला तर समृद्धी महामार्गाचा उपयोग करून २४ जिल्ह्यांपैकी किमान १४ जिल्ह्यांत पेट्रोलियम इकोझोन तयार करता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्यात नदी जनजागृती बैठका
खेड ः खेड तालुक्यातील नानावले, वाक्षेप, महाळुंगे अंबवली, वरवली आणि चाटव या गावांमध्ये नदी जनजागृती बैठका घेतल्या. त्या त्या गावातील नदीची प्रत्यक्ष पाहणे, भविष्यातील नियोजनासंदर्भात विचारमंथन केले. या वेळी अतिशय उत्स्फुर्तपणे गावकरी सहभागी झाले. आपापल्या गावातील नदीसाठी काम करण्याचा संकल्प त्या त्या गावातील गावकर्‍यांनी केला. प्रांत राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नोडल ऑफिसर सत्यजित गोसावी, त्या त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक तलाठी दीपक यादव, ऋषिकेश मोरे संगलट गावचे सामाजिक कार्यकर्ते युवा साबीर कौचाली, सरफराज पोत्रिक, सतीश कदम, देवानंद यादव, संतोष मोरे, प्रकाश महाडिक, विश्वास कदम आणि अनेक नदी कार्यकर्ते व संपूर्ण दिवसभरात जवळपास ५०० नागरिक या नदी परिसरातील या जलपरिक्रमेमध्ये सहभागी झाले होते. गाळाने भरलेल्या नद्या, कोकण टाईप बंधार्‍यांची नद्यांवर आवश्यकता, साखळी बंधारे, जलव्यवस्थापन, पाण्याचा प्रभावी वापर, गावात होणारे नद्यांचे प्रदूषण या विषयांवर दिवसभर चर्चा झाली.

बुद्धिमान विद्यार्थ्यांना एकत्र आणून क्विझ
रत्नागिरी ः भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक कार्यालय रत्नागिरीने २७ जानेवारीला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले. शालेय मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने तटरक्षक दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक ‘क्विझ क्लॅन’ म्हणून एका शाळेचे स्पर्धक अशा रत्नागिरी शहरातील सहा नामांकित शाळा या सर्वसमावेशक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. डॉ. किशोर सुखटणकर, संचालक, मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपकेंद्र हे या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे मुख्य अतिथी म्हणून लाभले होते तर भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर आणि भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. तटरक्षक दलातर्फे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रश्नमंजुषा मास्टर कृती टामटा यांनी केले. या स्पर्धेत सर्वंकष विद्यामंदिर ही शाळा विजेता ठरली तर नवनिर्माण हाय. उपविजेता ठरली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

जुन्या संचालकांबरोबर नवीनानाही संधी
रत्नागिरी ः कुसुमताई सहकारी पतसंस्थेची २०२३-२८ साठीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पडली. जुन्या संचालकांबरोबर काही नवीन संचालकांना या वेळी संधी देण्यात आली आहे.
या निवडणुकीत संचालक म्हणून दत्तात्रय शिंदे, सतीश शेवडे, विजय बेहेरे, प्रमोद रेडीज, प्रसन्न दामले, अविनाश जोशी, महेश सनगरे, तेजा मुळये, लीना घाडीगावकर, अनंत कोकरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सांगितले. कोरोनामुळे दोन वर्ष निवडणूक पुढे ढकलण्यात आली होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. तोडणकर (कार्यालय अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी) यांनी काम पहिले. संस्थेने आतापर्यंत सभासदांना व ठेवीदारांना योग्य त्या सोयीसुविधा दिल्या आहेत. उत्तम वसुली व प्रत्येक वर्षी नफा व सातत्याने मिळणारा ऑडिट ‘अ’ वर्ग ही संस्थेची बलस्थाने आहेत. नवीन संचालक उत्तमप्रकारे पतसंस्था वाढीसाठी काम करतील, असा विश्वास प्रा. नाना शिंदे यांनी व्यक्त केला.