
चिपळूणात ढोल ताशे, तुतारी निनादाने भारावले वातावरण
rat१९p४३.jpg -KOP२३L८३९४६
चिपळूण ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना प्रसाद शिंगटे सोबत बाळा कदम व सकल मराठा समाजातील कार्यकर्ते.
चिपळूणमध्ये शिवजयंतीचा उत्साह
ढोल ताशे, तुतारीने भारावले वातावरण, शहर व्यापले भगव्याने; पारंपरिक पोशाखात दुचाकी रॅली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद् असे चित्र शहरात पाहायला मिळाले.
विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांत आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे शहराला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.
चिपळूण पालिकेत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पालिकेच्या आवारातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी पालिकेत येवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करून अभिवादन केले.
मुंबई - गोवा महामार्गावर अतिथी सभागृहाच्या बाहेर उभारलेल्या मंडपात सकाळी १० वाजता शिवपूजन झाले. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजता भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. शेकडो शिवभक्त या वेळी मोटारसायकल घेवून पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. या वेळी विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत चिपळूण तालुका मराठा महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दरम्यान हजेरी लावून शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
चिपळूणच्या सुपुत्राने केली आफ्रिकेत शिवजयंती
चिपळूण येथील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय लियाकत चौघुले यांचे सुपुत्र शरीफ चौघुले हे सध्या आफ्रिका देशातील टांझानिया येथे वास्तव्यास असून ते तेथील नगरसेवक देखील आहेत. कोकणच्या या सुपुत्राने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मराठी बांधवांना एकत्रित आणून साजरा केला. आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात असतानाच परदेशातही आपले मराठी बांधव आपल्या राजांचा हा उत्सव साजरा करून जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा प्रसार करताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परदेशात साजरी करणाऱ्या शरीक चौघुले यांचे आता संपूर्ण कोकणातून कौतुक केले जात आहे.