नडगिवेत रंगला शिवराज्याभिषेक सोहळा

नडगिवेत रंगला शिवराज्याभिषेक सोहळा

swt1937.jpg
83944
नडगिवेः शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारलेले मावळे, जिजाऊमाता आणि बालशिवाजी. (छायाचित्र : एन. पावसकर)

नडगिवेत रंगला शिवराज्याभिषेक सोहळा
शिवनामाचा गजरः नॅशनल इंग्लिश मीडियमची अनोखी मानवंदना
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ : आदर्श एज्युकेशन सोसायटी, खारेपाटण संचलित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा यादगार ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांची प्रतिमा साकारलेल्या भव्य तैलचित्राची विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या वेशभूषेतून सादर केलेल्या लेझीम नृत्याच्या तालात आणि वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी संपूर्ण वातावरण शिवरायांच्या गजराने निनादले होते. मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व संस्थेचे समन्वयक पराग शंकरदास यांनी दीपप्रज्वलनाने शिवरायांच्या तैलचित्राचे अनावरण केले. तैलचित्रातील शिवप्रतिमेला श्रद्धा व सन्मानपूर्वक पुष्पहार समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवेदनाबरोबरच सादरीकरणातून झाले.
शिवजन्म, पालकारोहण, पाळणागीत आणि शिवरायांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची प्रतापी कारकीर्द व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, अभिनय, नृत्य आणि गायन-वादन या सांस्कृतिक उपक्रमांनी सादर करण्यात आली. त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारलेल्या शिवराय आणि जिजामाता यांचे लेझीम नृत्याने स्वागत करीत वाजतगाजत स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील मावळ्यांनी त्यांच्यावर पृष्पवृष्टी केली. गागाभट्टांनी शिवरायांचा विधियुक्त राज्याभिषेक केला. मावळ्यांसह प्रजाजनांनी शिवरायांना मानवंदना दिली. विद्यालयातील सहशिक्षिकांनी मराठमोळ्या वेशभूषेतून शिवरायांची सामुदायिक आरती गाऊन स्तुती केली. विद्यार्थ्यांनी सामूहिक पोवाड्याचे दर्जेदार सादरीकरण केले. शिवस्तुतीतून शिवरायांच्या गुणांचा, पराक्रमांचा आणि कर्तबगारीचा महिमा वर्णन करण्यात आला. अखेर भारदस्त सिंहगर्जनेने कार्यक्रमाची शानदार सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com