... अन्यथा सिंधुदुर्गनगरीत उपोषण

... अन्यथा सिंधुदुर्गनगरीत उपोषण

...अन्यथा सिंधुदुर्गनगरीत उपोषण
सावळाराम अणावकर ः सेवानिवृत्त शिक्षकांचा माजगावात मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन महिन्याच्या एक तारीखला न मिळाल्यास तसेच आर्थिक देयकांचा प्रश्न निकाली न लागल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी माजगाव येथे दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी संघटना शाखा सावंतवाडीचा वार्षिक आनंद मेळावा तालुकाध्यक्ष दत्ताराम फटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सिध्दिविनायक हॉल, माजगाव येथे नुकताच झाला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अणावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, बापू सावंत, किशोर नरसले, जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप बागवे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भालेकर, स्त्री सदस्य मुननकर, वेंगुर्ले, दोडामार्ग व कुडाळ तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते आदींसह तालुक्यातील सुमारे शंभर सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
अध्यक्ष फटनाईक यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक आणि २०२२-२३ च्या अहवालाचे वाचन केले. प्रलंबित आर्थिक देयके शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सचिव सावंत-भोसले यांनी मागील इतिवृत्त व जमाखर्च सादर केला.
या मेळाव्याप्रसंगी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सात माजी शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अणावकर, उपाध्यक्ष प्रकाश दळवी, किशोर नरसुले, बापू सावंत, प्रताप बागवे यांनाही गौरविण्यात आले. अशा कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दळवी यांनी केले. बागवे, नरसुले, सरमळकर, सावंत, कुसगावकर आदींनी विचार मांडले. तालुकाध्यक्ष फटनाईक यांनी आभार मानले.

चौकट
प्रलंबित आर्थिक देयके अशी...
अनियमित होणारी पेन्शन एकमेव सावंतवाडी तालुक्याला ६ महिने होऊन गेले तरी न मिळालेला ३ टक्के महागाई फरक, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता, गटविमा रक्कम, निवडश्रेणी, वरिष्ठ श्रेणी, अप्रशिक्षित शिक्षकांची पेन्शन, रजा रोखीकरण आदी प्रलंबित आर्थिक देयके शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com