
देवरूख ःजिल्ह्यात हक्काच्या मतदारसंघासाठी भाजपाची कसरत
जिल्ह्यात हक्काच्या मतदारसंघासाठी भाजपाची कसरत
विद्यमान आमदारांनाच संधीची शक्यता ; पक्षीय जागा वाटप अडचणीचे
संदेश सप्रे ः सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २० ः राज्यात सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती आहे. ही युती आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास रत्नागिरी जिल्ह्यात हक्काचा मतदार संघ मिळवताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे मंडणगड-दापोली, खेड-गुहागर, चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर, राजापूर-लांजा असे पाच मतदार संघ आहेत. यापैकी मंडणगड-दापोलीत शिंदे गटाचे योगेश कदम, खेड-गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव, चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम, रत्नगिरीत शिंदे गटाचे उदय सामंत तर राजापूरला ठाकरे गटाचे राजन साळवी आमदार म्हणून कार्यरत आहेत. पुढील निवडणुकांचा अंदाज घेता हे सर्वच्या सर्व आमदार पुन्हा निवडणूक लढवणार हे निश्चित आहेत. त्यामुळे पक्षीय वाटपानुसार जागा कशा वाटायच्यात, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
भाजपच्यादृष्टीने विचार केल्यास २००९ पूर्वी जिल्ह्यात ७ मतदार संघ होते. त्यात गुहागर आणि रत्नागिरी या दोन जागा भाजपला सोडण्यात यायच्या. या दोन्ही ठिकाणी अनेक टर्म भाजपचे आमदार होते; मात्र २००९ नंतर स्थिती बदलली. रत्नागिरीचा विचार करता विद्यमान पालकमंत्री उदय सामंत शिवसेनेत आले आणि भाजपला येथे बाळ मानेंच्या रूपात पराभव पत्करावा लागला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची विराट सभाही भाजपला वाचवू शकली नाही. आता तर सामंत हे शिंदे गटात असून, ते राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे ही जागा युतीत शिंदे गटाला सोडणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, रत्नागिरीत भाजपची डाळ शिजताना कठीण आहे. गुहागरचा विचार करता यापूर्वी (कै.) तात्या नातू आणि नंतर डॉ. विनय नातू यांच्यानंतर इथे भाजपचा आमदार नाही. डॉ. नातूंची बंडखोरी, रामदास कदमांची घुसखोरी यात चिपळुणमधून जाऊन भास्कर जाधवांना आमदारकीची लॉटरी लागली. तेव्हापासून ते आजपर्यंत इथे आमदार आहेत आणि आता ते ठाकरे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना फाइट देण्यासाठी मागील निवडणुकीत कमी वेळात सर्वाधिक मतदान घेणारे कुणबी समाजाचे सहदेव बेटकर यांना आधीपासूनच रिंगणात उतरवण्यात आले आहे. परिणामी, गुहागर हा हक्काचा बालेकिल्लाही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
मंडणगड-दापोलीत योगेश कदम शिंदे गटाकडून निश्चित आहेत तर चिपळूण-संगमेश्वरमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम यांना फाइट देण्यासाठी शिंदे गट माजी आमदार सदानंद चव्हाण यांना रिंगणात उतरवणार हे निश्चित आहे. एकूणच आगामी निवडणुकीच्यादृष्टिने पाचही मतदार संघांचा विचार करता भाजपसाठी युतीत जागांचे गणित बसवणे अडचणीचे नसून खोळंबा, अशी स्थिती होण्याची शक्यता आहे.
चौकट
राजापूरची जागा भाजप स्वीकारणार का?
राजापूरचा विचार करता इथे शिंदे गटाकडे कोणी तुल्यबळ उमेदवार नाही. परिणामी, विद्यमान आमदार राजन साळवींच्या विरोधात लढण्याची वेळ भाजपवर येऊ शकते; मात्र भाजपकडेही या भागात तगडा उमेदवार नाही. त्यामुळे भाजप ही जागा स्वीकारणार का, हा प्रश्नच आहे.