कुणकेश्वर यात्रेची समुद्रस्नानाने सांगता

कुणकेश्वर यात्रेची समुद्रस्नानाने सांगता

swt209.jpg
L84038
कुणकेश्‍वरः येथील किनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी देवस्वाऱ्यांबरोबरच भाविकांची गर्दी झाली होती. (छायाचित्रः वैभव केळकर)

कुणकेश्वर यात्रेची समुद्रस्नानाने सांगता
शिवभक्तांच्या रांगाः यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २०ः असंख्य शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्या, त्यांच्यासोबतच्या मंडळींसह यात्रेकरू भाविकांनी समुद्रस्नान केले. समुद्रस्नानानंतर भाविकांची दर्शनासाठी रांग होती. यात्रेनंतर देवस्थान समितीसह सुरक्षा यंत्रणा काहीशी निवांत झाल्याचे दिसत होते. दरम्यान, तीन दिवस चाललेल्या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल झाली.
महाशिवरात्रीच्या दिवशी शनिवारी यात्रेचा प्रारंभ झाला होता. महाशिवरात्रीला यात्रेत मोठी गर्दी झाली होती. रविवारी दुपारनंतर अमावस्या सुरू झाल्यामुळे यात्रेत समुद्रस्नानासाठी गर्दी वाढू लागली होती. आज दुपारपर्यंत अमावस्या असल्याने रविवारी रात्रीपासूनच समुद्रस्नानाला सुरुवात झाली होती. आज पहाटेपासून स्नानानासाठी किनाऱ्यावर गर्दी उसळली होती. कुणकेश्‍वर भेटीसाठी विविध ठिकाणच्या देवस्वाऱ्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी झाली होती. देवस्वाऱ्यांसोबत आलेल्या मंडळींनीही समुद्रस्नान केले. लहान मुलांबरोबरच महिला व ज्येष्ठांनीही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. समुद्रस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात होती. रविवारी रात्रीपासूनच किनाऱ्यावर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवली होती. समुद्राच्या पाण्यात खोलवर न जाण्याचा संदेश देण्यात येत होता. लहानमुलांना सांभाळण्याची सूचनाही केली जात होती. समुद्रस्नान करून देवस्वाऱ्या माघारी परतल्या. यात्रा कालावधीत विविध राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी श्री देव कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. विविध ठिकाणच्या भजनी मंडळींची मंदिरात भजने झाली. रविवारी रात्री विविध मालिकेतील कलाकारांनी यात्रेत हजेरी लावली होती. यामध्ये बाल कलाकारांचाही समावेश होता. देवस्थानच्यावतीने कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज सकाळी समुद्रस्नान करून दर्शन घेण्यावर अनेकांचा भर होता. सायंकाळपर्यंत रस्त्यावर वर्दळ दिसत होती. यात्रेत हॉटेल व्यावसायिक तसेच खाजा, विविध खाद्यपदार्थ, शेतीजन्य विविध अवजारे, कलिंगड, कपडे, तयार कपडे, भांडी, शोभिवंत वस्तू, प्लास्टिक साहित्य, खेळणी यांची मोठी उलाढाल झाली. यात्रेत पंचायत समितीचा कक्ष कार्यरत होता. यात्राकाळात रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. खासगी, दुचाकी वाहनांची संख्याही मोठी होती. रात्री मंदिर परिसर, समुद्रकिनाऱ्यासह यात्रा परिसर गर्दीने फुलून गेला होता. समुद्रकिनारच्या भेळ, आईस्क्रिम, विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. बच्चे कंपनीनी घोडेस्वारीबरोबरच उंटावरून फिरण्याचा आनंद घेतला.

चौकट
देवस्वाऱ्या माघारी
समुद्रस्नानासाठी आलेल्या देवस्वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील वातावरण भक्तिमय बनले होते. समुद्रस्नानानंतर देवस्वाऱ्या माघारी परतल्या. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असल्याने गर्दी झाली होती. यात्रेची सांगता झाल्याने सुरक्षा यंत्रणाही निवांत झाल्याचे दिसत होते. तीन दिवस चाललेल्या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. मनोरंजन आणि लहान मुलांसाठी असलेल्या खेळांना प्रतिसाद लाभला. बच्चे कंपनीने खेळांचा मनमुराद आनंद घेतला. बारावी, दहावीच्या परीक्षा तोंडावर असतानाही यात्रा गजबजली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com