
चिपळूण ः गोविंदगडावर शिवरायांची भव्य रांगोळी
फोटो ओळी
- rat२०p२१.jpg --KOP२३L८४०५३ः चिपळूण ः गोविंदगडावर आयोजित शिवजयंती कार्यक्रमात लक्षवेधी ठरणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी.
-----------
गोविंदगडावर शिवरायांची भव्य रांगोळी
शिवजयंती ; राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन
चिपळूण, ता. २० ः सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ बाय १२ फुटी हुबेहूब रांगोळीने साऱ्यांनाच अवाक् केले. स्थानिक रांगोळीकार उदय मांडे, प्रथमेश विचारे व सुशील कुंभार यांनी दोन दिवसाच्या अथक परिश्रमातून भर उन्हाचे चटके सोसत ही रांगोळी रेखाटली. गडकिल्ले संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या राजे सामाजिक प्रतिष्ठानने शिवजयंती निमित्ताने येथील गोविंदगडावर ही आगळीवेगळी संकल्पना राबवत शिवरायांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
राजे सामाजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शनिवारी रात्री १२ वा. गोविंदगडावर मशाल प्रज्वलित करण्यात आली. दरवर्षी चिपळूण, खेड व गुहागर आदी भागातून अनेक मंडळे येथून मशाल प्रज्वलित करून घेऊन जातात. रविवारी सकाळी गडदेवतेचे पूजन झाल्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन व आरती पार पडली. शिवजयंतीचे औचित्य साधून राजे सामाजिक प्रतिष्ठानने सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहोळा झाला. सायंकाळी प्रमोद महाराज राणे यांची शिवचरित्रावर कीर्तन झाले. वारकरी संप्रदाय गोवळकोट यांनी त्यांना साथसंगत दिली. शिवजयंती कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर काढण्यात आलेली १२ बाय १२ फुटीची रांगोळी! या रांगोळीकडे पाहताच प्रत्यक्ष गोविंद गडावरच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झाले आहेत, असाच भास होतो.