शिवराय सर्वधर्मसमभावाचे प्रतिक

शिवराय सर्वधर्मसमभावाचे प्रतिक

swt2022.jpg
84118
सावंतवाडीः छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक दालनाचा प्रारंभ करताना फादर मिलेट. सोबत अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. जी. ए. बुवा, सुरेश गवस, जहांगीर बेग आदी.


शिवराय सर्वधर्मसमभावाचे प्रतिक
अॅड. संदीप निंबाळकरः सावंतवाडीत सर्वधर्मीयांतर्फे ‘शिवजागर’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः सर्वधर्मसमभाव जपणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्या नावाचा वापर धर्माधर्मात तेढ निर्माण करण्यासाठी होत असल्यास असे प्रकार हाणून पाडले पाहिजेत. धार्मिक, जातीय सलोख्याचे प्रतिक म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आणि आचरण व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. संदीप निंबाळकर यांनी येथे केले.
''आम्ही भारतीय'' व श्रीराम वाचन मंदिर यांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त आयोजित सर्वधर्मीय शिवजागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक दालनाचा प्रारंभ करण्यात आला. ‘आम्ही भारतीय’चे डॉ. जी. ए. बुवा, फादर मिलेट, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, सुरेश गवस, जहांगीर बेग आदी उपस्थित होते.
अॅड. निंबाळकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाविरोधात असल्याचे सांगत धार्मिक, जातीय सलोखा बिघडवण्याचे काम काही ठिकाणी केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज स्थापनेसाठी लढले. त्यांनी तीन वेळा सावंतवाडी संस्थानच्या राजांशी लढाई केली. सावंतवाडी संस्थानचे राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते; मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थानचे राजे हे आपल्या राज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्याच्या विचारांचे होते. त्यामुळे ह्या लढाया झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज तंजावरपर्यंत पोहोचले. तंजावरमध्ये त्यांचा सावत्र भाऊ राज्य करत; मात्र त्यानेही नकार दिल्याने त्याच्याशी सुध्दा युद्ध केले. त्यामुळे एका धर्माविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज होते, असे म्हणणे चुकीचे आहे. स्वराज्य संरक्षण आणि विस्तारासाठी छत्रपतींनी कुतुबशहा, आदिलशहा यांच्यासह औरंगजेबाविरोधात लढाई केली. या युद्धनीतीनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील तसेच केले."
डॉ. बुवा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मौनी महाराज आणि छत्रपतींच्या भेटीबद्दल माहिती दिली. किल्ल्याची पायाभरणी करताना महाराजांनी बळी देणास विरोध केला. यावेळेपासून अंधश्रद्धा निर्मूलन देखील झाले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी चौफेर कामगिरी केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराज यांनी मंदिर उभारले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
फादर मिलेट यांनी शिवचरित्र हाच खरा इतिहास आहे. ते शूरवीर, दानशूर, न्यायी राजे होते. न्याय देताना त्यांनी भेदभाव केला नाही. मानव जातीसाठी रयतेचे राज्य केले. जातीपातीच्या भिंती तोडून रयतेला त्यांनी न्याय दिला, असे गौरवोद्गार काढले. महेश परुळेकर यांनी शिवविचार घेऊनच प्रत्येकाने वाटचाल करावी, असे आवाहन केले. भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना त्यांच्या आचार-विचारांचे जोपासना झाली पाहिजे, असे ते म्हणाले. अर्चना घारे-परब, दर्शना बाबर-देसाई, रामानंद शिरोडकर, बाळ बोर्डेकर, मोहन जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com