विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे
विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे

विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे

sakal_logo
By

swt2024.jpg
84132
सिंधुदुर्गनगरी : येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे लोकार्पण करताना केंद्रीयमंत्री नारायण राणे. सोबत आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, राज्य परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, उमेश तोरसकर आदी.

विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे
केंद्रीय मंत्री नारायण राणेः बाळशास्त्री जांभेकर स्मारक, पत्रकार भवनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २०ः पत्रकारिता हा व्यवसाय नसून पेशा आहे. त्याचे पावित्र्य टिकविणे आपला धर्म आहे. यासाठी पुस्तके वाचा. वाचनातून विचार आत्मसात करता येतात. केवळ राजकीय बातम्यांसाठी प्रयत्न न करता विकासात्मक लिखाणावर लक्ष दिले पाहिजे. विकासाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणारे लिखाण झाले पाहिजे. जिल्ह्यात प्रगतीचे पोषक वातावरण निर्माण होणारे लिखाण पत्रकारांनी केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन लोकार्पण सोहळ्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथे शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या भवनाचा प्रारंभ राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी येथे बसविण्यात आलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुद्धा मंत्री राणे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, आमदार नितेश राणे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, “आजचा दिवस जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला हक्काचे कार्यालय, इमारत, मिळाली असून विधायक चर्चा करण्यासाठी, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी स्वतःची जागा मिळाली आहे. समाजाला योगदान देण्यासाठी पत्रकारांची काय भूमिका आहे ? याचा विचार करावा. तुम्ही विकासाबद्दल बोलावे, चर्चा करावी, असे मला वाटते. नोकरी पेक्षा उद्योजक बनण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करावी. जिल्ह्यात सर्व प्रकारची फळे पिकतात. परंतु ती एक्स्पोर्ट कुठे होतात. कुठेच नाही. त्यामुळे जिल्ह्यात किती उद्योग आहेत ? कोणते उद्योग चालू शकतात ? त्यासाठी शासन काय करीत आहे ? याबाबतचे लिखाण जिल्ह्यातील पत्रकारांनी करावे.”
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, “पुढील २५ वर्षात होणारे पत्रकारितेतील बदल, टेक्नॉलॉजी यात आपण किती बदलतो यावर भविष्य टिकून राहणार आहे. हे भवन राज्यातील पत्रकारांसाठी आदर्श ठरावी. कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावा.” जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी, एवढी मोठी इमारत उभारल्या बद्दल सर्व पत्रकारांचे आपण अभिनंदन करते. अन्य राज्यासाठी हे मार्गदर्शन ठरणार आहे. याचा मला अभिमान आणि गर्व असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले. संघटनेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी मुंबई-गोवा या महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे. आपण यासाठी मनावर घ्यावे असे आवाहन मंत्री राणे यांना केले. यावेळी संघटनेच्या माजी अध्यक्षांचा, मूर्तीकार, वास्तू विशारद यासह या भवनासाठी योगदान देणाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राज्य परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी अध्यक्ष शशिकांत सावंत, संतोष वायंगणकर, वसंत केसरकर, जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, बाळ खडपकर, रमेश जोगळे, विद्याधर केनवडेकर, सावळाराम नाईक, देवयानी वरसकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन निलेश जोशी, ज्योती तोरसकर यांनी केले.

चौकट
पावित्र्य जपण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्याच्या माध्यमातून या स्मारकासाठी पाच कोटी रुपये दिले आहे. यापुढे आवश्यक असलेल्या सुविधा सरकार देईल, बाळशास्त्री यांचे कार्य विसरता येणार नाही. त्यांनी समाज सुधारणेवर भर दिला. हे स्मारक प्रेरणादायी ठरावे. त्याचे पावित्र्य जपले जावे. पुढच्यावेळी जिल्ह्यात आल्यावर या स्मारकाला भेट देण्यात येईल, असे यावेळी ऑनलाईन उपस्थिती दर्शविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करताना सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन बोलताना देशाला पत्रकारितेचा वारसा देणारे म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख होतो. पत्रकारांच्या अधिस्वीकृतीबाबत असलेल्या अडचणी सोडविल्या जातील, स्मारक मधील लायब्ररीसाठी मराठी भाषा विभागाकडून पाच ते सहा लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार, असे आश्वस्त केले.