
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न
swt213.jpg
84278
मुंबईः स्वराज्य शिलेदार संस्था प्रभादेवीच्या वतीने सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न
सुनील पवारः मुंबईत स्वराज्य शिलेदार संस्थेतर्फे शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी घडविले. त्यांचा आदर्श जोपासताना इतिहास विसरू नये. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. येथील गडकिल्ल्यांच्या संवर्धन, जतनासाठी निश्चितच प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी मुंबई-प्रभादेवी येथे शिवजयंती उत्सवात केले.
पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली स्वराज्य शिलेदार संस्था, प्रभादेवी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य स्वरुपात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गड किल्ल्यांची स्पर्धा, मर्दानी ख़ेळांचे प्रात्यक्षिक आणि शिवकालीन नाणी, जुने दस्तऐवज आदींच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे पदाधिकारी समीर वरेकर, राजन गावडे, आप्पा परब, राजू देसाई, स्वराज्य शिलेदार संस्थाध्यक्ष प्रीतेश भोसले, सचिव प्रशांत म्हात्रे, खजिनदार अपर्णा नांदगावकर आदी उपस्थित होते
पवार पुढे म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला अनेक आव्हाने स्वीकारून वाटचाल करायची आहे. तुम्ही सर्व मुले देशाचे आधारस्तंभ आहात. देशाच्या जडणघडणीत तुमचे योगदान फार महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षणाचे धडे घेतानाच आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी आई, वडील व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करा. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. थोर महात्म्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आतापर्यंत झाले नाही आणि भविष्यात होणे नाही. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलांनी वाटचाल केली पाहिजे. शिवचरित्रासह इतर इतिहास वाचला पाहिजे, टिकवून ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे असून देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज आहे.’’ संस्थेच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला.