
चिपळूण ः चिपळुणात काँग्रेस दुप्पटीने वाढवण्याचा बैठकीत निर्धार
चिपळुणात काँग्रेस दुप्पटीने वाढविणार
प्रशांत यादवांवर विश्वास ; बैठकीत निर्धार, हातसे हात जोडो अभियान यशस्वी करणार
चिपळूण, ता. २१ ः जे पक्ष सोडून गेले त्यांचा अजिबात विचार करू नका. चारजण गेले असले तरी आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागू या, असा ठाम निर्धार व्यक्त करत प्रशांत यादव यांच्यावर पूर्ण विश्वास नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रशांत यादव पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, असे ठामपणे हुसेन दलवाई म्हणाले. चिपळूण काँग्रेसची बैठक माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. या वेळी शहराध्यक्ष लियाकत शहा, युवकचे फैसल पिलपिले, ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, सुरेश राऊत, सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, भरत लब्धे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार माजी नगरसेवकांनी केलेला शिंदे गटात प्रवेश तसेच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राजीनामा आशा पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली होती.
बैठकीत चिपळूण शहरात पक्षाची सद्यःस्थिती व माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश या संदर्भात चर्चा करण्यात आली. चारजण गेले असले तरी त्याचा पक्षावर फारसा परिणाम होणार नाही कारण, काँग्रेसचा कार्यकर्ता अद्यापही पक्षाबरोबर आहे तसेच सर्व पदाधिकारीदेखील ठामपणे पक्षाबरोबर आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. कोणीही विचलित न होता पक्षाचे काम मजबुतीने करा, चारजण गेले असले तरी आगामी निवडणुकीत १० ते १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना माजी खासदार दलवाई यांनी केल्या.
यादव यांच्या राजीनाम्यावर देखील बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असून योग्य तो निर्णय होईल. यादव यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी ते पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत. ते निष्ठवंत काँग्रेस विचारांचे आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू असून लवकरच तो विषय निकाली निघेल आणि यादव जोमाने पक्षाच्या कामाला सुरवात करतील, असा विश्वासदेखील दलवाई यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे हातसे हात जोडो अभियानाबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षाचे हे अभियान चिपळूणमध्ये पूर्ण ताकदीने राबवण्यासाठी या वेळी नियोजन करण्यात आले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी ठरली आहे. जनमत काँग्रेसच्या बाजूने तयार होत आहे. त्यामुळे हातसे हात जोडो अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेऊन काम करावे, अशा सूचना दलवाई यांनी यावेळी दिल्या.
चौकट-
प्रशांत यादवांशी चर्चा सकारात्मक
काँग्रेस नेते हुसेन दलवाई व जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी प्रशांत यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीचा तपशील उपलब्ध झाला नसला तरी चर्चा सकारात्मक झाली असल्याचे व प्रशांत यादव पक्ष सोडणार नसल्याचे या भेटीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याची चर्चा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकण्यास मिळत होती.