जिल्ह्यातील 350 कोटींची धरण कामे मार्गी

जिल्ह्यातील 350 कोटींची धरण कामे मार्गी

धरण कामे लागणार मार्गी
वैभववाडी, कणकवलीतील प्रकल्पः न्यायालयात दाखल याचिका घेतली मागे
तुषार सावंतः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ः महाविकास आघाडी सरकार काळात जिल्ह्यात मंजूर झालेल्या ३५० कोटींच्या जलसंधारण विभागाच्या धरण प्रकल्पांच्या विरोधातील जनहित याचिका अखेर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जलसंधारण विभागाकडून जिल्ह्यातील चार धरण प्रकल्पांना मंजुरी दिली होती; मात्र सत्तांतर झाल्यानंतर ८ जुलै २०२२ मध्ये जलसंधारणच्या विविध कामांच्या निविदांना राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने स्थगिती दिली होती. ही स्थगिती उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये उठवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जलसंधारणच्या कामांना परवानगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेचा निकाल लागला असून ही याचिका जनहित याचिका कशी काय होऊ शकते, असा सवाल करीत याचिकाकर्त्याला न्यायालयाने धारेवर धरले. त्यामुळे संबंधितांनी जनहित याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या पूर्वीच्या निविदा प्रक्रिया पुढे सुरू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
कणकवली तालुक्यातील भिरवंडे-गांधीनगर, सावडाव आणि वैभववाडी तालुक्यातील दिंडवडे, नावळे जलसंधारण विभागाच्या धरण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी ३५० कोटीची प्रशासकीय मान्यता आहे. या प्रकल्पात एक हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचबरोबर कणकवली तालुक्यातील दहा आणि देवगड तालुक्यातील सात धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत. कणकवली तालुक्यातील गांधीनगर येथील धरण प्रकल्प मंजूर झाला असून यासाठी ९३ कोटी ८३ लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा रक्कम ८२ कोटी ९७ लाख रुपये आहे. या प्रकल्पांतर्गत २४८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सावडाव धबधबा बारमाही सुरू व्हावा, या अनुषंगाने सावडाव दोन लघुपाट योजना मंजूर झाली असून कोटी ८६ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाखाली २४८ हेक्‍टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे योजना ही करुळ आणि भुईबावडा या दोन गावांदरम्यान असून येथे शंभर कोटी १५ लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा रक्कम ८६ कोटी ६७ लाख रुपये असून या प्रकल्पाचा पाणीसाठा ४५०० स.घ. मीटर आणि लाभ क्षेत्र २४८ हेक्टर आहे. नावळे लघुपाट योजनेअंतर्गत ३९ कोटी ८४ लाख निविदा मंजूर असून प्रशासकीय मान्यता ४७ कोटी ७५ लाख रुपयांची आहे. या प्रकल्पाखाली १६५ जमीन ओलिताखाली येणार आहे. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण चार प्रकल्पांमध्ये २७५ कोटीची निविदा आहे. यावरची जनहित याचिका मागे घेण्यात आल्याने धरणांच्या पुढील कामांच्या प्रक्रिया सुरू होणार आहेत.

चौकट
प्रस्तावित प्रकल्प
कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे, बिडवाडी गणेशखोंड, दिगवळे रांजणवाडी, हरकुळ खुर्द मोहुळ, नाटळ मोगरणे, दारिस्ते, करंजे पिंपळाची भारी, हरकुळ खुर्द दळवीवाडी, भिरवंडे हेळेवाडी, रामेश्वरनगर भिरवंडे असे दहा प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर देवगड तालुक्यातील साळशी तळीसकल, साळशी देवनेवाडी, म्हावळुंगे परीकवाडी, पोंभुर्ले आडीचे धरण, शिरवली महादेवाचीवाडी, शिरगाव निमतवाडी आणि विठ्ठलादेवी फणसगाव पारवनेवाडी येथे धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत.

कोट
जलसंधारणच्या जिल्ह्यातील ३५० कोटीच्या धरण प्रकल्पाला असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. ही प्रक्रिया पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार किंवा झालेल्या स्थितीत पुढे जाणार, हे वरिष्ठ पातळीवरून निश्चित केले जाईल; पण मंजूर झालेली निविदा प्रक्रियेप्रमाणे कामाचे आदेश निघतील, अशी स्थिती आहे. कणकवली आणि वैभववाडीतील एकूण चार धरण प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया यापूर्वीच राज्यस्तरावरून पूर्ण झाल्या आहेत.
- संतोष शिरोडकर, उपविभागिय अभियंता, जलसंधारण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com