
कणकवली : दारू वाहतूक
८४३६२
ओसरगाव टोल नाक्यावर
गोवा बनावटीची दारू जप्त
दारू वाहतुकीसाठी टेम्पोत चोर कप्पा : महामार्ग पोलिसांची कारवाई
कणकवली, ता. २१ : गोवा ते चिपळूण जाणाऱ्या टेम्पोमध्ये आज गोवा बनावटीची दारू आढळली. चालक केबिन आणि हौदा यामध्ये विशेष कप्पा तयार करून त्यात दारूचे बॉक्स ठेवले होते. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा दारू वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला.
महामार्ग पोलिसांचे पथक कणकवली ते कसालदरम्यान गस्त घालत होते. सकाळी सहाच्या सुमारास गोवा ते चिपळूण जाणाऱ्या टेम्पोबाबत महामार्ग पोलिस सुमित चव्हाण यांना संशय आला. ओसरगाव टोलनाका येथे हा टेम्पो थांबविला. यावेळी टेम्पोच्या हौद्यामध्ये किरकोळ किराणा साहित्य आढळले. तरीही टेम्पोचे टायर दबलेल्या स्थितीत होते. टेम्पोची अधिक तपासणी केली असता, चालकाची केबिन आणि हौदा यामध्ये विशेष कप्पा आढळला. तसेच या कप्प्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ७५० मिली बॉटलचे ६० बॉक्स आढळून आले. त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशीसाठी चालक गणेश गजानन काळसेकर (वय २४, रा. निरवडे, सावंतवाडी) याच्यासह टेम्पो कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी वाहतूक पोलिस सुमित चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईवेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक, हवालदार सुनील वेंगुर्लेकर कॅलीस डिसोझा, देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.