
फोटोसंक्षिप्त-देवगड, शिरगाव केंद्रांना पोलिस निरीक्षकांची भेट
फोटोसंक्षिप्त
८४३८९
देवगड, शिरगाव केंद्रांना
पोलिस निरीक्षकांची भेट
देवगड ः येथील पोलिस ठाणे हद्दीतील बारावी परीक्षेकरीता असलेल्या देवगड आणि शिरगाव परीक्षा केंद्रांना पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. येथील महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर एकूण ७७२ विद्यार्थी, तर शिरगाव हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रावर २३८ विद्यार्थी परीक्षेकरिता बसले आहेत. दोन्ही केंद्रांवरील मिळून एकूण १०१० विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याची माहिती देण्यात आली.
महाविद्यालयीन शिक्षणाची पुढील दिशा ठरवणारी महत्त्वाची मानली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची गर्दी झाली होती. सुरक्षिततेसाठी गस्तीवरील असलेल्या येथील पोलिसांनी देवगड आणि शिरगाव अशा दोन्ही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. येथील महाविद्यालयातील केंद्राला भेट दिली. त्यावेळी शरद शेटे यांच्यासह अन्य उपस्थित होते. तर शिरगाव परीक्षा केंद्राच्या भेटीवेळी मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक सुरेश सुतार यांच्यासह अन्य उपस्थित होते. देवगड परीक्षा केंद्रावर एक पोलिस अंमलदार, एक होमगार्ड तसेच शिरगाव केंद्रावर एक पोलिस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
८४३९०
रिमा मुंबरकर यांना
आदर्श सरपंच पुरस्कार
देवगड ः तालुक्यातील मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व पंचशील महिला मंडळाच्या सचिव रिमा मुंबरकर यांना सांताक्रुझ (मुंबई) येथील सानेगुरुजी आरोग्य मंदिर या संस्थेच्यावतीने यंदाचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनी पुरस्कार वितरण होणार आहे. दरवर्षी आदर्श सरपंच निवड प्रक्रिया मुंबई येथील गेली तीस वर्षे पंचायत राज क्षेत्रात प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्यावतीने करण्यात येते. मुंबरकर यांनी सरपंच असताना केलेल्या कामाची माहिती मंडलिक ट्रस्टच्यावतीने साने गुरुजी आरोग्य मंडळाला देण्यात आली होती. डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट व साने गुरुजी आरोग्य मंडळ या संस्थांनी मुंबरकर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.