
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
कामत विद्यामंदिरात शिवजयंती साजरी
रत्नागिरी ः आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यामंदिरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेच्या विशेष शिक्षिका मानसी कांबळे यांनी या सूत्रसंचालन केले. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
--------
कॅनरा बँकेच्या कर्ज मेळाव्याला प्रतिसाद
रत्नागिरी ः कॅनरा बँकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कर्ज मेळाव्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मेळाव्याचे उद्घाटन बँकेचे एजीएम श्रीशरण मोगर यांनी दीपप्रज्वलनाने केले. मांडवी येथील हॉटेल सी फॅन्स येथे हा कर्ज मेळावा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाइचे नित्यानंद भुते, एजीएम श्रीशरण मोगर, डीएम फुले, कोस्टगार्डचे कमांडन्ट जी. श्रीनिवास आदी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक निशित गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यामध्ये गृहकर्ज, वाहनकर्ज, सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, तारण कर्जांची माहिती देण्यात आली तसेच कागदपत्र पूर्तता करून कर्ज वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील व्यावसायिक, कर्जदार, ठेवीदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
--------
फोटो ओळी
rat21p6.jpg-KOP23L84230 रत्नागिरी ः शिवजयंतीनिमित्त शिवसह्याद्री ग्रुप व विशाल भोसले मित्र परिवारातर्फे पाण्याची टाकी देताना विशाल भोसले, ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण व कार्यकर्ते.
--------------
शिवसह्याद्री ग्रुपतर्फे शिवजयंती
रत्नागिरी ः शिवसह्याद्री ग्रुप व विशाल भोसले मित्रपरिवारातर्फे शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोमेंडीचे माजी सरपंच के. के. जाधव उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण म्हणाल्या, शिवजयंती साजरी करताना जास्तीत जास्त समाज प्रबोधन कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवावेत. विशाल भोसले यांनी माहेर वृद्धाश्रम संस्थेला देत असलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना सोबत घेऊन केलेली शिवजयंती खूपच छान उपक्रम आहे. संस्थेला दिलेली पाण्याची टाकी खूपच उपयुक्त ठरणारी आहे. सूत्रसंचालन मोरगे यांनी केले. या वेळी मंदार बने, राजेंद्र बारगोडे, अमित चव्हाण, दिलीप कदम, भाई साळवी, सागर खानविलकर, अनिता मोरगे, माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.
---
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये शिवजयंती
रत्नागिरी ः गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला. राज्यगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी, दूरदर्शी, महान संघटक, मुत्सद्दी आणि सर्वगुणसंपन्न असे राजे होते. सर्वांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन राष्ट्राविषयी कर्तव्याची भावना अधिक दृढ केली पाहिजे. संपूर्ण शिवचरित्र म्हणजे एक आदर्श कार्य आणि देदिप्यमान इतिहास असून संपूर्ण राष्ट्राला तो सदैव प्रेरणा देणारा आहे. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. आभार प्रा. शिवाजी उकरंडे यांनी मानले.
लांजा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
लांजा ः एकच मिशन, जुनी पेन्शनच्या घोषणा देत लांजा कॉलेज परिसर दणाणून सोडण्यात आला. लांजा महाविद्यालयातील महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय शिक्षकेतर कर्मचारी हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. या वेळी या घोषणा दिल्या. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध रास्त मागण्यांसाठी वेगवेगळ्या टप्प्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन काम बंद आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जुनी पेन्शनसह अन्य महत्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठ कर्मचारी संघाच्यावतीने छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.