
संक्षिप्त
पान ५ साठी)
बेहेरे विद्यालयाचे समूहगीत स्पर्धेत यश
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत स्पर्धेत यश मिळवले आहे. पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी शिवजयंतीनिमित्त समूहगीत स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पारितोषिक स्वरूपात रोख रुपये ३ हजार ५०० व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी धनराज जंजीरकर व शैलेश धोपट यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डॉ. शशिशेखर शिंदे यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
निबंध स्पर्धेत अनुष्का भोसलेचे यश
दाभोळ ः थिंक महाराष्ट्र डॉट कॉम व कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षामधील अनुष्का भोसले हिने तृतीय पारितोषिक मिळवले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण वराडकर महाविद्यालयात झाले. राकेश भडंग यांच्या हस्ते अनुष्का भोसले हिला गौरवण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे निबंध थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. ज्योती चौगले, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. सिद्धी साळगांवकर, प्रा. ऋचा दळवी व प्रा. श्रद्धा खुपटे यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.
पद्मनाभदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती
दाभोळ ः दापोलीतील सह्याद्री प्रतिष्ठानकडून दापोली ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळेकाजी लेणी येथील प्रणालकदुर्ग उर्फ पद्मनाभदुर्ग या किल्ल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेल्या वर्षभरापासून दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. पायवाट, तटबंदी आणि टाके स्वच्छतेची कामे करण्यात आली असून येत्या काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने इतिहास व दुर्गसंवर्धन जागर करण्यात येणार आहे, असे दापोली विभाग संपर्कप्रमुख ललितेश दवटे यांनी सांगितले. संस्थेचे ओंकार मोरे, राहुल खांबे आणि अजिंक्य कोळंबेकर यांनी दुर्गसंवर्धन कार्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आव्हान केले. या उत्सवात दीपोत्सव, दुर्ग इतिहास आणि संवर्धन यावर विशेष चर्चासत्र, स्थानिक ग्रामस्थांचा सत्कार व मनोगत झाले तसेच श्रीवर्धन, मंडणगड, खेड आणि मुंबई या विभागांचे दुर्गसेवक उपस्थित होते.
84291
आयटीआयच्या श्रमशिबिराचे उद्घाटन
रत्नागिरी ः येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे निवासी श्रमसंस्कार शिबिर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत नाचणे गावामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांच्या हस्ते झाले. या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे प्राचार्य एस. जी. कोतवडेकर व प्राचार्य पी. एस. शेट्ये यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर सरपंच भोंगले यांनी आपल्या मनोगतातून ''नॉट मी बट यू'' या एनएसएसच्या घोषवाक्याचा अर्थ समजावून सांगितला. शिबिराला संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायत करेल असे सांगितले. या समारंभाला नाचणेच्या उपसरपंच निलेखा नाईक, शिवानी रेमुळकर, रश्मी कोळंबेकर, सुचिता घडशी ज्येष्ठ नागरिक वसंत झगडे, ग्रामविकास अधिकारी जी. के. खरंबळे व ग्रामपंचायत लिपिक घाग उपस्थित होते. या वेळी माजी कार्यक्रम अधिकारी शेलार यांनी सुद्धा स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी बिबवणेकर, जाधव, पिलणकर, शिंदे, गादीकर, बिर्जे, झारी, पांचाळ तसेच सर्व नियमित निदेशक व तासिका तत्त्वावरील निदेशक व सर्व स्वयंसेवक या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.