
कुडाळमध्ये एकाचवेळी 145 जणांना नोकरी
swt२१२७.jpg
84459
कुडाळः येथे आयोजित रोजगार मेळाव्यास युवक-युवतींचा प्रतिसाद लाभला.
कुडाळमध्ये एकाचवेळी १४५ जणांना नोकरी
रोजगार मेळाव्यास प्रतिसादः व्हरेनियम क्लाउड, एडमिशन, सिक्युअर्ड क्रेडेशिअलचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल या कंपन्यांच्या वतीने आज येथील एमआयडीसीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात १४५ जणांना ऑन दी स्पॉट ‘जॉब लेटर’ देण्यात आले.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे, व्हॅरेनियमचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर मुकुंदन राघवन, सिक्युअर्ड क्रेडेशिअलचे राहुल बेलवलकर, अमित साटम, प्रोजेक्ट हेड विनायक जाधव आणि ऍडमिन संदीप नाटलेकर, सतीश पाटणकर आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नाईक यांनी, कुडाळ एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची आवश्यकता असून आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून येथील स्थानिक तरुण-तरुणांना संधी मिळाली आहे. येथील एमआयडीसीत काही ठिकाणी रोजगार उपलब्ध असले तरी काही बंद आहेत; मात्र व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा स्थानिकांना फायदेशीर आहे, असे गौरवोद्गार काढले.
या रोजगार मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतून १२०० युवक-युवतींनी हजेरी लावली. यातील १४५ जणांना ऑन दी स्पॉट ''जॉब लेटर'' देण्यात आले. तर मेळाव्यात वायोसिम एन्टरप्राइजेस, व्हीआर सन्स इंजिनिअरिंग, वेदांत टेक्नो, व्हरेनियम क्लाउड, स्पार्कप्लस टेक्नो, सिक्युअर्ड क्रेडेशिअल, साईशक्ती ऑटो, क्वेस कॉर्प, पेटीम, ओम गणेश इलेक्ट्रिक, मोरया फॅब्रिकेशन, कॉनबॅक, जैतापकर ऑटोमोबाईल्स, एचडीएफसी लाईफ, ग्रीन मॅप ऍग्रो, ग्लेनमार्क फार्मा, युरेका फोर्ब्ज, डिस्टील एजुकेशन, भगीरथ एन्टरप्राइजेस, एअरटेल, अभिनव इन्स्टिटयूट आदी कंपन्यांनी सहभाग घेतला.
संचालक साबळे म्हणाले, "रोजगार मेळाव्याबरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मॉडेल करिअरच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. तर कंपनीकडून नुकत्याच झालेल्या सावंतवाडी येथील रोजगार मेळाव्यात सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाला आहे. तरुणांना काम देणे हा एकमेव उद्देश कंपनीचा आहे."
सिक्युअर्ड क्रेडेशिअलचे बेलवलकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर महिन्याला रोजगार मेळावे भरविण्याचा आमचा मानस आहे. यामुळे स्थानिक स्तरावर नोकऱ्या उपलब्ध होतील. सिंधुदुर्गातील मुलांमध्ये टॅलेंट असून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही सावंतवाडीत पहिले सिंधुदुर्गातील बीपीओ सेंटर सुरू केले. त्यावेळी प्रथम ५ मुलांना संधी दिली होती. आता बीपीओमध्ये ३० मुलांना संधी मिळाली आहे. कंपनी लवकरच कुडाळमध्ये सुद्धा बीपीओ सेंटर सुरू करण्याच्या विचारात आहे.
अमित साटम यांनी या रोजगार मेळाव्यातून ‘ऑन दी स्पॉट’ जॉब देण्यात येत असून आतापर्यंत १७० ते १८० जणांना यातून रोजगार मिळाला आहे. पुढे यातून ४०० ते ४५० जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये असलेल्या टॅलेंटला वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात मुंबईतून अनेक कंपन्या सिंधुदुर्गात येणार असल्याने आम्ही टाकलेले पाऊल योग्य असल्याचे सिध्द होईल, असे ते म्हणाले.