
जिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू
जिल्ह्यात ४ मार्चपर्यंत
मनाई आदेश लागू
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून ४ मार्चपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भागात मनाई आदेश लागू केला आहे.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करून एकमेकांना लक्ष्य करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोकण विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी बारावी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत व दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यामध्ये परिरक्षक केंद्र ९ बारावीकरीता २३ परीक्षा केंद्र व दहावीकरिता ४१ परीक्षाकेंद्र अशी परीक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राचे कामकाज सुव्यस्थित चालावे, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.