जिल्हा बँकेतर्फे पूरक योजना

जिल्हा बँकेतर्फे पूरक योजना

84518
निवजे ः सायलेज मशीनचे उद्‍घाटन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी.

जिल्हा बँकेतर्फे पूरक योजना

मनीष दळवी ः निवजे येथे प्रक्रिया उद्योग युनिटचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः जिल्हा परिषद, कृषी विभाग, राज्य, केंद्र या सगळ्यांच्या योजना एकत्रित करून त्यांना पूरक अशा योजना जिल्हा बँकेने आणल्या आहेत. शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते धोरणात्मक बदल बँकेने केले आहेत. आपली जिल्हा बँक राज्य आणि केंद्राच्या योजना राबविणारी देशातील पहिली बँक बनली आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी निवजे येथे केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२२-२३ अंतर्गत लाभ मिळवून उभारणी केलेल्या श्री निवजेश्वर मुरघास प्रक्रिया उद्योग युनिटचा प्रारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते तालुक्यातील निवजे गावी करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक प्रकाश मोर्ये, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, ‘गोकुळ’चे पशुधिकारी नितीन रेडकर, अनिल शिर्के, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी म्हणाले, ‘‘आम्ही दुग्धोत्पादनाच्या दृष्टीकोनातून निवजे हे मॉडेल गाव मानतो. हे मॉडेल विकसित झाले पाहिजे. यासाठी जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू. जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आणल्या. त्याची अंमलबजावणीही केली. दहा वर्षांत २५ लाखांपर्यंत कर्ज दुधाळ जनावरांसाठी दिले जात होते. तर दहा महिन्यांत दहा कोटींपेक्षा जास्त कर्ज दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी जिल्हा बँकेने वितरित केले आहे. या योजनांमध्ये बदल केल्यावर शेतकऱ्यांना पूरक असे धोरण तयार केले. बँक दरवर्षी दोन हजार कोटीपर्यंत कर्ज वितरण करते; पण या कोट्यवधीच्या कर्ज वितरणामध्ये जे समाधान मिळत नाही, ते समाधान आज केलेल्या सहा लाखांच्या कर्ज वितरणामध्ये मिळाले आहे. या कर्ज वितरणातून जे काही भविष्य उज्ज्वल होणार आहे, त्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. दुग्ध व्यवसाय म्हणून निवजे गाव मॉडेल म्हणून पुढे आणले गेले. तसेच सायलेज निर्मितीच्या दृष्टीने गावाने उत्पादक व्हावे व जिल्ह्यासमोर यावे.’’

‘आत्मनिर्भर पॅकेज’साठी बॅंकेचे प्रयत्न
पंतप्रधान आत्मनिर्भर पॅकेज कशा पद्धतीने जिल्ह्यात राबविता येईल, शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल, यासाठी जिल्हा बँक प्रयत्नरत आहे. १०० पेक्षा जास्त प्रकल्प तसेच अण्णासाहेब पाटील, शामराव पेजेसारख्या योजना यापूर्वी कधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. राष्ट्रीयकृत बँका ही यातील प्रमुख अडचण होती. राष्ट्रीयकृत बँका या योजना राबवण्यासाठी तयार नव्हत्या. सुदैवाने नारायण राणे या खात्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपलब्ध करून दिली. निवजे गावाने १५० लिटरवरून ५५० लिटर दूध उत्पादन क्षमतेवर आपले गाव नेले आहे. वीस हजार लिटर दूध कोल्हापूरहून सिंधुदुर्गमध्ये येते. हा फरक भरून काढायचा असल्यास जास्तीत जास्त उत्पादन झाले पाहिजे. तरच सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर बनू शकतो, असे यावेळी उपाध्यक्ष काळसेकर म्हणाले.
...............
चौकट
लाभार्थीस धनादेश
भगीरथ प्रतिष्ठानच्यावतीने या योजनेचे लाभार्थी दत्तात्रय सावंत यांना २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य यावेळी करण्यात आले. या रकमेचा धनादेश जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते सावंत यांना देण्यात आला. यावेळी मुरघास यंत्राचे (सायलेज मशीन) उद्घाटन दळवी यांच्या हस्ते झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com