
वाढत्या तापमानाची आंबा फळांना झळ
84551
देवगड ः येथील परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी निवेदन दिले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
वाढत्या तापमानाची आंबा फळांना झळ
देवगडमधील चित्र; राष्ट्रवादीने वेधले प्रशासनाचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः वाढत्या तापमानामुळे आंबा फळांना झळ बसण्यासह काही भागांत फळांची गळ होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील आंबा बागायतदारांना शासनाकडून दिलासा मिळण्यासाठी तालुका राष्ट्रवादीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी येथील परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई यांच्याकडे आज दिले. यावेळी सोबत आणलेली खराब झालेली आंबा फळे प्रशासनाला दाखविण्यात आली.
वाढत्या तापमानामुळे फळांना झळ बसत आहे. फळांवर काळे डाग पडून फळे खराब होण्याबरोबरच काही भागात फळे गळण्याचे प्रमाणही आहे. आधीच उत्पादन कमी आणि त्यात तापमानाची अडचण असल्याने समस्या वाढल्या आहेत. यासाठी बागायतदार शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी घाटे यांच्यासह मोंड सरपंच शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट, विनायक जोईल, चंद्रकांत पाळेकर, शामकांत शेटगे, नागेश आचरेकर, प्रदीप मुणगेकर, दिनेश मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी फळपीक विम्याच्या निकषांबाबतही चर्चा झाली.
निवेदनात म्हटले आहे की, ‘‘गेले काही दिवस सातत्याने हवामानात बदल होत आहे. कधी जोराचा वारा, कडक ऊन, तर कधी दाट धुके आणि दव पडत असल्यामुळे आंबा पीकाला अडचण निर्माण होत आहे. यंदा आंबा उत्पादन सध्यातरी १५ टक्केच असल्याचे दिसते. त्यातच मध्यंतरी वातावरणातील उष्णता कमालीची वाढल्याने आंबा फळांना उष्णतेची झळ बसत आहे. त्यामुळे तयार आंबा फळे होरपळून फळांवर काळे डाग पडत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आंबा फळे गळून पडत असल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होत आहे. मध्यंतरी तालुक्यातील उष्णतेचा पारा ३७ डि.से. पर्यंत पोचण्याइतकी उष्णता वाढली होती.’’ दरम्यान, आंबा समस्येच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागालाही शिष्टमंडळाने निवेदन दिले. तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याशी नंदकुमार घाटे यांनी चर्चा केली. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
---
84587
फळांवर काळे डाग, बागायतदार हैराण
आंबा फळांवर काळे डाग पडण्याबरोबरच फळे गळून पडत असल्यामुळे आंबा बागायतदार हैराण आहेत. त्यातच दाट धुके आणि दवाचे वाढते प्रमाण यामुळे आंबा पिकाचे नुकसान होत आहे. आंबे गळून पडत असल्याने होणाऱ्या नुकसानीतून तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागामार्फत तातडीने सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या पाहणीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करून आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
......................
कोट
अलीकडे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे बागायतीसह आंबा फळांचे रक्षण करण्यासाठी शक्य असल्यास बागायतदारांनी झाडांना पाणी दिले पाहिजे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पालापाचोळा यांचे अच्छादन केल्यास सोयीचे होईल. पाण्यामुळे फळे चांगली तयार होण्यास मदत होईल.
- कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, देवगड