परुळेबाजारचा स्वच्छतेत नवा ''पॅटर्न''

परुळेबाजारचा स्वच्छतेत नवा ''पॅटर्न''

swt२३२.jpg
८४७६०
परुळेबाजारः वित्त आयोग निधीतून गौतमनगर येथे उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रकल्प.
swt२३३.jpg
८४७६१
पाणी शुध्दीकरणासाठी सार्वजनिक विहिरीवर बसविण्यात आलेले आधुनिक यंत्र.
swt२३४.jpg
८४७६२
दुचाकीला जोडलेल्या ट्रॉलीद्वारे कचरा गोळा केला जातो.
swt२३१४.jpg
८४७५८
प्रणिती आंबडपालकर
swt२३१५.jpg
८४७५९
विनायक ठाकूर

परुळेबाजारचा स्वच्छतेत नवा ‘पॅटर्न’
कल्पक उपक्रमांचा वापरः सांडपाणी पुनर्वापरासह लक्षवेधी काम
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ः निसर्गसंपन्नतेने नटलेले, अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले परुळेबाजार (ता. वेंगुर्ले) गाव आता स्वच्छतेत नवे मापदंड निश्चित करण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वच्छतेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा, कल्पक उपक्रमांचा वापर करत त्यांनी वेगळी वाट धरली आहे. गौतमनगर या मागास वस्तीत राबविलेले सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी विहिरीमध्ये टीसीएल टाकण्यासाठी बसविलेली ऑटोमॅटिक मशिन, अत्यंत दुर्गम भाग असताना गावातील तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेली जीम, महिलांसाठी पायपुसणी व अन्य साहित्य बनविण्यासाठी उपलब्ध करून दिलेली व्यवस्था येथे लक्षवेधी ठरत आहे.
मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ घालणारा परुळे बाजार गावाने आता स्वच्छ्ता अभियानामध्ये मोहोर उमटविली आहे. डोंगर, झाडी आणि मुबलक पाणी ही नैसर्गिक बलस्थाने लाभलेल्या परुळे बाजार ग्राम पंचायतीने पुढील काही दिवसांत कोकण विभाग तपासणी समिती गावात येणार असल्याने पूर्ण गाव पूर्वतयारीसाठी जोरदार काम करीत आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने २०२१-२२ या वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करीत विभागस्तरावर मजल मारली आहे. कोकण विभागीय समिती काही दिवसांत तपासणीसाठी गावात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांसाठी बुधवारी परुळेबाजार गावासाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, वेंगुर्ले गटविकास अधिकारी मोहन भोई, कृषी अधिकारी विद्याधर सुतार आदी अधिकारी उपस्थित होते. परुळेबाजार समितीच्या सरपंच प्रणिती आंबड, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप प्रभू, माजी सरपंच श्वेता चव्हाण, ग्रामसेवक शरद शिंदे यांनी पत्रकारांचे जंगी स्वागत करीत गावात राबविलेल्या बहुतांश उपक्रमांच्या ठिकाणी नेत माहिती दिली. यावेळी अन्य सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
परुळेबाजार ग्रामपंचायत इमारतीत प्रवेश केल्यावरच ही ग्रामपंचायत उपक्रमशील आणि नावीन्याचा स्वीकार करणारी असल्याचे स्पष्ट होते. इमारत व्यावसायिक दुष्टीकोनातून उभारलेली असून इमारतीत एक बँक आहे. सभागृह भाड्याने देण्यात येतो. याच इमारतीत जीम उभारलेली आहे. गरजेच्या वेळी नागरिकांना उपयोगी पडावी म्हणून शववाहिनी सुद्धा ग्रामपंचायत इमारतीत ठेवण्यात आलेली आहे. सध्या या गावात प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. गाव स्वच्छ आहे. गावातील रस्ते सुस्थितीत आहेत, हे गावात फिरताना जाणवते. गावाच्या सीमेवर चिपी विमानतळ आहे. यावरून गाव विकासाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होते.
२२३३ एवढी लोकसंख्या असलेल्या या गावात प्रत्येक नागरिक छोट्यामोठ्या कामात व्यस्त दिसला. या गावात वर्षाला २० लाख नारळ पीक मिळते. यावरून कल्पवृक्ष म्हणून जागतिक मान्यता असलेल्या नारळ झाडांची येथील असलेली संख्या लक्षात येते. पूर्वी यातील फक्त नारळ उत्पादन हेच उत्पादनाचे साधन होते, पण आता येथे काथ्या उद्योग सुरू झाल्याने नारळ, नारळ सोडणे, झावळे यांचाही उपयोग होत आहे. तीन रुपये दराने नारळ सोडणे विकत घेतली जात आहेत. त्यामुळे नारळ पिकातून उत्पादनाची साखळी निर्माण झालेली येथे पाहायला मिळाली. शाळा आणि अंगणवाड्या इमारती आकर्षक आणि सर्व सुविधायुक्त दिसल्या. विशेष म्हणजे येथे राबविण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम गावाला स्वच्छ्ता अभियानात हातभार लावणाऱ्या आहेत.
कचरा उचलण्यासाठी तयार केलेली घंटागाडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रामीण भागातील सुका कचरा शेतीसाठी खत म्हणून वापरला जातो. त्यामुळे तो एकत्रित करण्याची आवश्यकता नाही; पण ओला कचरा गोळा करण्याची सुविधा आहे. ओला कचरा निर्मिती जास्त नाही. त्यामुळे मोठे वाहन न वापरता दुचाकीला ट्रॅक्टरची ट्रॉली लावून त्यात कचरा पेट्या ठेवल्या आहेत. या दुचाकीने गावात फिरून कचरा गोळा केला जातो. गावातील एकजूट आणि गावकऱ्यांचा सहभाग प्रत्येक उपक्रमातून सिद्ध होतो. शाळेत अस्मिता कक्ष सुरू करून मुलींसाठी विशेष सुविधा केली गेली आहे. शाळा, ग्रामपंचायत आणि मोक्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ऑक्सिजनची गरज पडल्यास ती सुविधा उपलब्ध केली असून गावात ''ब्लड बँक'' सुद्धा स्थापन केली आहे. मुबलक पाणी असताना सुद्धा २५ बंधारे बांधण्यात आले आहेत.
गावात शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. अत्यंत क्रियाशील महिला बचतगट कार्यरत आहेत. महिला कापडी पिशव्या तयार करतात. मेणबत्ती प्रशिक्षण गावात सुरू दिसले. अगरबत्ती बनविण्याचे काम सुद्धा सुरू आहे. या गावाने जिल्ह्यात पहिली डिजिटल अंगणवाडी बनविण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे गावच्या सीमारेषेवर काथ्या प्रकल्प सुरू केला आहे. चांदा ते बांदा योजनेतून सुमारे ८० लाख रुपये खर्च करून हे युनिट सुरू केले असून सुमारे २५० महिलांना यामुळे रोजगार मिळाला आहे. एकंदरीत गावात राबविलेले सर्व उपक्रम अन्य ग्रामपंचायतींनी बोध घ्यावा, असे आहेत.

चौकट
लक्षवेधी काम
* जिल्ह्यातील पाहिला सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रकल्प
* दलितवस्तीत प्रकल्प सुरू करून वेगळा आदर्श
* नारळ झाडे आणि त्यापासून मिळणारे उत्पादन जमेची बाजू
* सुपारीच्या झावळांपासून साहित्य
* पायपुसणी मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
* काथ्या व्यवसाय ठरतोय महिलांसाठी वरदान

चौकट
याची आहे आवश्यकता
* गौतमनगर ही दाट वस्ती असल्याने परिसर स्वच्छ्तेकडे लक्ष देणे गरजेचे
* उत्तम नियोजनाच्या सादरीकरणात सुधारणा आवश्यक
* २० लाख नारळ फळ उत्पादनाचा लेखाजोखा गरजेचा
* ग्रामपंचायत सभागृहात गावातील उपक्रमांची माहिती हवी लिखित स्वरुपात
* पाणी आणि त्याच्या वापराबाबत ताळेबंदाचा फलक आवश्यक

कोट
परुळे बाजार ग्रामपंचायतीने आतापर्यंत शासनाच्या विविध अभियानाच्या माध्यमातून दीड कोटींची बक्षिसे मिळविली आहेत. स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम, यशवंत पंचायत राज यात उत्तम कामगिरी करीत बक्षिसे प्राप्त केली आहेत. राज्य राष्ट्रीय स्तरावरील सहा बक्षिसे मिळाली आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोकण विभागात बाजी मारण्यासाठी काम सुरू आहे.
- प्रणिती आंबडपालकर, सरपंच, परुळे बाजार

कोट
परुळे बाजार गावाची एकजूट चांगली आहे. लोकांचा सहभाग सुद्धा लक्षवेधी आहे. गावात चांगले उपक्रम राबविले गेले आहेत. अजून नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी ही ग्रामपंचायत कोकण विभागात ठसा उमटवून राज्यात कोकण विभागाचे नेतृत्व करेल.
- विनायक ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com