मानवजातीचे खरेखुरे मायबाप ः श्रीमान भागोजीशेठ कीर

मानवजातीचे खरेखुरे मायबाप ः श्रीमान भागोजीशेठ कीर

rat२३२८.txt

बातमी क्र. २८ ( पुरवणीसाठी लेख)

rat२३२१.jpg
८४८०८
-पतितपावन मंदिर

rat२३२२.jpg -
८४८०९
श्रीमान भागोजीशेठ कीर यानी उभारेल्या इमारती

आजच्या मतलबी जीवनामध्ये श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा आदर्श खरोखरीच प्रेरणादायी ठरेल. कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि दानशूरता याचं दूसरं नाव ''भागोजी बाळोजी कीर'' यांच्याशिवाय असूच शकत नाही. अठराविश्व दारिद्रय आणि प्रचंड श्रीमंती आपल्या आयुष्यात पाहणारे भागोजींसारखे थोडेच लोक या जगात असतील. ''एक सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक'' म्हणून आजच्या काळात भागोजींवर पुस्तके निघाली असती किंबहुना आयआरएममध्ये व्याख्याने देण्यासाठी त्यांना पाचारण केले गेले असते.

- राजीव यशवंत कीर, रत्नागिरी
--

मानवजातीचे खरेखुरे मायबाप ः श्रीमान भागोजीशेठ कीर

रत्नागिरीतील पेठकिल्ला येथील बाळोजी व सौ. भागिर्थीबाई कीर या अत्यंत गरीब दाम्पत्याच्या पोटी १८६९ ला भागोजींचा जन्म झाला. भागोजीच्या मनात पोटाची खळगी कशी भरायची याचा विचार घोळत होता. विचार करता करता त्यांच्यासमोर सोनचाफ्याचे फूल दिसले. त्या फुलातच त्याने भविष्याचा वेध घेतला. फुले गोळा केली आणि बाजार गाठला आणि रोज फूले विकून एक-दोन आणे मिळवून वडिलांना कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आधार मिळवून दिला. त्या वेळी होड्या, बोटी, बांधण्यासाठी आपल्याकडे उंडीच्या झाडांचा वापर व्हायचा. या उंडीच्या बिया भागोजी गोळा करू लागले व या बिया तेल काढण्यासाठी बाजारात नेऊन विकू लागले. त्या काळी या कडू तेलाचा वापर पथदीपांसाठी केला जात असे. फुले आणि बिया विकून मिळणारे पैसे आईच्या हातावर ठेवताना आईचे डोळे पाणावून जात असत.
या अल्लड वयामध्ये आपण आई-वडिलांना मदत करू शकतो, या विचाराने भागोजी निश्चयी बनले. ते पाहात होते की, गावातील लोकं मुंबईला जाऊन पैसा कमावू लागतात; पण भागोजींना मुंबईला नेणार कोण? मुंबईला जायला पैसे देणार कोण? बंदरात बोट लागलेली असताना ते तडक बंदरावर गेले. बोटीच्या तांडेलाला विनम्रपणे सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत; परंतु नशीब आजमावण्यासाठी मुंबईला जायचे आहे. भागोजींना बोटीत प्रवेश मिळाला. मुंबई सेंट्रल रेल्वेस्टेशनच्या फलाटावर रात्र काढली. सकाळी रेल्वे आल्यानंतर प्रवाशांचे ओझे वाहण्याचे काम त्यांनी केले. त्याचवेळी एका सद्गगृहस्थाचे सामान बग्गीमध्ये भरताना त्याच्या पत्नीचे लक्ष या लहान भागोजीकडे गेले. तिने या मुलाला आपल्याकडे कामासाठी घेऊया का? अशी विचारणा आपल्या पतीकडे केली. भागोजी त्यांच्यासोबत घरी गेले. ते होते पालनजी मेस्त्री. त्यांचा सुतारकामाचा व्यवसाय होता. या ठिकाणी धावून आला तो राजिवड्यातील टेक्निकल हायस्कूलमधील सुतारकामाचा अनुभव. या कामामुळे दोनवेळच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था झाली. पगार काही मिळणार नव्हता; परंतु पालनजींच्या परवानगीने फुकट जाणारा लाकडाचा भुसा आणि ठोकळे जळणाच्या वापरासाठी बाजारात विकू लागले. पालनजी शेठ यांनी भागोजींना आपल्या व्यवसायात चारआणे भागीदार बनवले. हळूहळू त्यांना काही कॉन्ट्रॅक्टस् घ्यायला लावली. बांधकाम व्यवसायातील गिरगाव चौपाटी येथील फूटपाथला लाद्या बसवण्याचे पहिले काम त्यांना मिळाले. त्यात प्रचंड फायदा झाला आणि साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद भागोजींवर पडू लागला. त्यांच्याकडे पुढे मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स चालून येऊ लागली. याच काळात बांधकामक्षेत्राचा मुंबईचा चेहरा सुंदर होऊ लागला. मुंबईतील अनेक मोठमोठ्या वास्तुशास्त्र नमुन्यांचे भागोजी शिल्पकार होऊ लागले. मुंबई सेंट्रल रेल्वेस्टेशन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉन स्टेडियम, लायन्स गार्डन, वाडिया बिल्डिंग, मफतलाल पार्क, माधवजी धरमशी मिल, नाशिक सिक्युरिटी प्रेस, इंडियन मर्चंट चेंबर, स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, कारवाना बिल्डिंग, अॅम्बॅसेडर हॉटेल इमारत, ग्वाल्हेर महाराजांचा बंगला अशा एकापेक्षा एक भव्य इमारतींचे बांधकाम भागोजींच्या हातून घडू लागले. समुद्रापासून मुंबईचे रक्षण करणारी मरिन ड्राईव्हची संरक्षक काँक्रिटची भिंतही भागोजीशेठ यांनीच बांधली. अशाप्रकारे सोनचाफ्याची फुले व उंडीच्या बिया विकणारा रत्नागिरीचा गरीब मुलगा मुंबईचा शिल्पकार ठरला. प्रचंड संपत्ती मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवर होते.
कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा तशी धार्मिकताही भागोजींच्या अंगी होती. त्यांची भगवान शंकरावर प्रचंड श्रद्धा होती. स्वतः पूजा करता यावी अशी त्यांची इच्छा होती. अस्पृशता मानली जात होती. त्या वेळी त्यांची गाठ पडली होती ती स्वातंत्रवीर सावरकर यांच्याशी. सावरकरांच्या विनंतीवरून भागोजी यांनी रत्नागिरीतील वरची आळी येथील शेवडे नामक व्यक्तीची २२ गुंठे जागा ६ हजार रुपये देऊन खरेदी केली. १० मार्च १९२९ ला करवीरचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या शुभ हस्ते कोनशिला बसवण्यात आली. त्या कार्यक्रमात शंकराचार्यांच्या हस्ते सत्काराचा मान मिळाला तो पांडू विठू महाराला. श्रीफळ व पुष्पगुच्छ स्वीकारताच हजारो उपस्थितांनी ''हिंदू धर्म की जय'' अशा गगनभेदी घोषणा दिल्या. सर्वांच्या भावना उचंबळून आल्या. अस्पृश्यतेची दरी मिटून समानतेची ज्योत पेटली आणि मंदिराच्या बांधकामास सुरवात झाली. पुढे दोन वर्षात म्हणजे २२ फेब्रुवारी १९३१ हा मूर्ती प्रतिष्ठापनचा दिवस ठरला. महाराष्ट्रातील ६०-७० अस्पृश्य विचारवंतांना भागोजीशेठनी जातीने निमंत्रणे पाठवली. हजारो लोकं दाटीवाटीने उपस्थित होते. संत पाचलेगावकर महाराज, मसूरकर महाराज, गोभक्त चाँढे महाराज, गाडगे महाराज, लालजी पेंडसे, भगूरचे गोपालराव देसाई, गोमांतकचे लवंदे यांच्या उपस्थितीत शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या शुभ हस्ते श्री लक्ष्मीनारायणाच्या नेत्रदीपक मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या वेळी शंकराचार्य, स्वा. सावरकर व भागोजींचा जयजयकार झाला. दलित उद्धाराचे आणि गोमाता रक्षणाचे अमोघ कार्य करणाऱ्या भागोजींच्या पुतळ्याचे अनावरण मंदिराच्या प्रांगणात हिंदू महासभेने स्वखर्चाने केले.
दुसऱ्याच दिवशी २३ फेब्रुवारी १९३१ ला अस्पृश्यांसमवेत ''न भूतो न भविष्यती'' असा सहभोजनाचा कार्यक्रम झाला. दीड लाख लोकं यात सामिल झाले. ही बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. सनातन्यांमध्ये खळबळ उडाली तर समाजसुधारकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. दलित सवर्णांनी हात हातात घेऊन मोठ्या मिरवणुकीने गणेशाची प्रतिष्ठापना केली. या वेळीही पुजेवेळी एका भंगी बांधवाने वेद व गायत्री मंत्र म्हटला. अचंबित झालेल्या मिशाळ वकिलांनी भंगी बांधवाला जवळ घेऊन कौतुकाने ५ रुपयाचे इनाम दिले.
या काळात देश स्वकियांच्या स्पृश्य-अस्पृश्यांच्या भेदभावात होता. अनेक क्रांतिकारक परकीयांच्या विरोधात लढत होते परंतु स्वकीयांच्या भेदभावातून देश मुक्त करण्याचा यशस्वी लढा भागोजीशेठ कीर यांनी लढला. देशामध्ये अस्पृश्यांसाठी त्यांचे पाय धुवून, त्यांच्याकडून मूर्तिपूजा घडवून, सहभोजन घडवणारे भागोजीशेठ कीर हे देशातील पहिले क्रांतिकारक ठरले! सहभोजनाचे वादळ देशभर घोंघावू लागले. पुण्यामधील भारतसेवक समाजातर्फे झालेल्या सहभोजनामध्ये पंजाबपासून मद्रासपर्यंतचे समाजसेवक आले होते. पुढे अकोला, अमरावती, देहू, बुलढाणा, बारामती, वन्हाड, कळंब-पुणे, मुंबई, आळंदी, पंढरपूर, विंचूर, राजापूर, चिपळूण, इगतपूरी असं महाराष्ट्रातच नव्हे तर कलकत्ता, मथुरा, हैद्राबाद, बडोदा, कराची, पाटणा, जबलपूर, पूर्व बंगाल, पंजाब असा सहभोजनाचा देशव्यापी कार्यक्रम झाला. ठिकठिकाणी अस्पृश्यांसाठी विहीर, पाणवठे खुले झाले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विश्व निर्माण करून मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे भक्तीभूषण दानशूर भागोजीशेठ कीर यांनी २४ फेब्रुवारी १९४४ या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी देह ठेवला. संपूर्ण मानवजातीच्या खऱ्याखुऱ्या मायबापाला विनम्र अभिवादन....!

धर्मशाळा, आश्रमशाळा, विद्यालयांची ऊभारणी

भागोजीशेठ कीर यांनी जागोजागी मंदिरे, धर्मशाळा, आश्रमशाळा, गोशाळा, विद्यालये, महिला विद्यालय, अनाथाश्रम उभे केले. या सर्वांचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून भागोजी बाळोजी कीर या न्यासाची स्थापना केली. पेठकिल्ला येथे २५० विद्यार्थ्यांची सोय होईल अशी शाळा बांधली. परमदैवत भागेश्वराच्या नावाने मुंबई, आळंदी, वाई येथे धर्मशाळा बांधल्या. रत्नागिरी-मुंबई येथे रत्नागिरी भागेश्वर मंदिर, राम-मारूती दत्तमंदिर, भगवतीमंदिरे बांधून भाविकांची देवदर्शनाची सोय केली. ते दरवर्षी महाशिवरात्रीला मुंबई येथून हजारो भक्तांना स्वखर्चाने बोटीतून रत्नागिरीत उत्सवासाठी आणत असत. किल्ला येथील पेशवेकालिन गणेशमंदिराचा जीर्णोद्धार केला. सामान्यांना राहायला परवडेल अशा वास्तू मुंबईत उभ्या केलेल्या भागेश्वरभुवन माटुंगा, भागेश्वर भुवन माहिम, आनंदभुवन १ व २, आगर बाझार, दादर, नळबाजार, कुंभारवाडा येथे रहिवासी इमारती उभ्या करून त्यातून मिळणाऱ्या भाड्यातून धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्याला कायम वाहते ठेवले. हिंदूची प्रचंड वस्ती असलेल्या दादरसारख्या ठिकाणी स्मशानभूमी नव्हती. खाजण आणि चिखलामुळे सरणावर ठेवलेले मृतदेह अर्धवट स्थितीत जळत. कोल्हे, कुत्रे ते मृतदेह ओढून विदारक परिस्थिती निर्माण होत होती. हे लक्षात घेऊन शिवाजीपार्कला बाजारभावाने नऊ एकर जागा स्वखर्चाने विकत घेऊन त्यावर स्मशानभूमी उभारली. याच जागेमध्ये चैत्यभूमीही वसलेली आहे.
--
स्वखर्चाने तांब्याची नळपाणी योजना करणार होते

रत्नागिरी येथे मुरूगवाडा स्मशानभूमी भागोजींनी स्वखर्चाने उभारली. अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या घरात जन्म घेतलेल्या भागोजींनी जिद्द, चिकाटी, धैर्य, स्वतःवरील विश्वास, प्रामाणिकपणा या गुणांच्या आधारे अहोरात्र कष्ट करून अपार संपत्ती मिळवली आणि सर्व जातीधर्मासाठी ओंजळी भरभरून वाटली.
रत्नागिरीच्या नगरपालिकेला स्वखर्चाने तांब्याची नळपाणी योजना करण्याचा त्यांचा मानस होता. त्यात त्यांच्या दोन अटी होत्या की, नळपाणी योजना मी स्वतः कार्यान्वित करणार, त्याची देखभालही मी करणार; परंतु शहरवासीयांकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येऊ नये; पण त्या वेळच्या राजकारण्यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला मच्छीमारांना होड्या ओढण्यासाठी जेटी नसल्याने किल्ला मासळी बाजार या ठिकाणी स्वखर्चाने जेटी बांधली. भागोजींकडून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी बाबूलनाथवर सोन्याचा बेल नित्यनेमाने अर्पण केला जायचा.
----
( लेखक रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष आहेत)

संकलन
राजेश शेळके
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com