
चिपळूण ः सुकन्या समृद्धी योजनेत चिपळूणची सरशी
----
संग्रहित-PNE19P32672
सुकन्या समृद्धी योजनेत चिपळूण टॉपर
जानेवारीत २ हजार ५१ खाती ; पालकांचा वाढला ओढा
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः येथील टपाल विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेच्या अभियानात चिपळूण पोस्ट विभाग टॉपर राहिला आहे. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत चिपळूणची सरशी झाली आहे. जानेवारी महिन्यात २ हजार ५१ खाती चिपळूण विभागाअंतर्गत उघडण्यात आली आहे.
अत्यंत कमी रकमेच्या बचतीवर मुलीच्या शिक्षण व विवाहासाठी मोठी रक्कम देणाऱ्या या योजनेकडे आता पालकांचा ओढा वाढला आहे. बचतीच्या रकमेवर सर्वाधिक व्याज देणारी ही योजना आहे. या योजनेत देशात महाराष्ट्र टॉपर ठरतानाच या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी घोडदौड सुरू आहे. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यात आत्तापर्यंत २६ हजार ७६० खाती उघडली आहेत. जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयाकडून या योजनेसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे विशेष अभियान राबवले गेले. मुलींच्या पालकांपर्यंत योजनेची माहिती देण्यासाठी जनजागर करण्यात आला. केवळ मुलींच्या लाभासाठी असलेली ही योजना इतर आर्थिक गुंतवणुकीच्या तुलनेत सर्वाधिक फायद्याची ठरते आहे.
.......
कोट
मुलींचे शिक्षण व लग्न या दोन मोठ्या खर्चाचा विचार एकाच योजनेत असल्याने पालकांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक समजली जाते. एकाच गुंतवणुकीत दोन लाभामुळे मुलींचे आरोग्य वगळता इतर खर्चासाठी वेगळी गुंतवणूक करण्याची गरज होत नाही. मुलगी ही दुसऱ्या घरी विवाहानंतर जाते म्हणून तिच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता कमी होण्यास या योजनेने मदत केली आहे.
- विनायक पानवलकर, पोस्ट अधिकारी चिपळूण
योजनेची वैशिष्ट्ये
केवळ २५० रुपयाच्या मासिक बचतीपासून सुरवात
दोन मुलींकरिता खाते उघडता येणे शक्य
मुलीचे लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद शक्य
मुलीच्या शिक्षणासाठी ५० टक्के खर्च शक्य
सध्याचा योजनेवरील व्याजदर ७.६ टक्के
चक्रवाढ व्याजामुळे परिपक्वता राशीचा लाभ
खाते उघडल्यापासून कमीत कमी १५ वर्षे भरणा
मुद्दलपेक्षा व्याज दुपटीपर्यंत
एकूण १५ वर्षातील भरणा व त्यावरील व्याज
९० हजार रुपये ः १ लाख ६५ हजार १९० रुपये
१ लाख ८० हजार रुपये ः ३ लाख ३० हजार ३७३ रुपये
४ लाख ५० हजार रुपये ः ८ लाख २५ हजार रुपये
९ लाख रुपये ः १६ लाख ५१ हजार ८५५ रुपये
१३ लाख ५० हजार रुपये ः २४ लाख ७७ हजार ७८२ रुपये
१८ लाख रुपये ः ३३ लाख ३ हजार ७०६ रुपये
२२ लाख ५० हजार रुपये ः ४१ लाख २९ हजार ६३५ रुपये