जिल्ह्यात 44,016 बालकांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात 44,016 बालकांची तपासणी
जिल्ह्यात 44,016 बालकांची तपासणी

जिल्ह्यात 44,016 बालकांची तपासणी

sakal_logo
By

जिल्ह्यात ४४,०१६ बालकांची तपासणी
जागरूक पालक अभियान ः प्राथमिक स्तरावर ३,६६८ बालके आजारी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानात ० ते १८ वयोगटातील एकूण १ लाख ४१ हजार ३३८ बालकांपैकी आतापर्यंत ४४ हजार १६ बालकांची तपासणी झाली. त्यामध्ये प्राथमिक स्तरावर विविध आजार असलेली ३ हजार ६६८ एवढी बालके सापडली आहेत. त्यापैकी काही बालकांना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. १५ मार्चपर्यंत सर्व बालकांची तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज दिली.
जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून जागृत पालक सुदृढ़ बालक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ० ते ६ वयोगटातील ३५ हजार ६६४ बालके, ७ ते १८ वयोगटातील १ लाख ०५ हजार ६७४ बालके अशी एकूण १ लाख ४१ हजार ३३८ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके कार्यरत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील मुलांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तर या आरोग्य तपासणीच्या कामासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची १९१ व जिल्हा सामान्य रुग्णालय ६ अशी एकूण १९७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या अभियान कालावधीत शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ हजार ५०१ बालके, खासगी शाळांची १५ हजार ६७३, आश्रम शाळा ४९, दिव्यांग शाळा १५१, अंगणवाडी ३४ हजार ५२६, खासगी नर्सरी बालवाडी २ हजार ७५३, बाल सुधार गृह ४, समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे १०६ आणि शाळाबाह्य मुले ५७५ अशी एकूण १ लाख ४१ हजार ३३८ मुलांची आरोग्य तपासणी या अभियान कालावधीत करण्यात येत आहे.
या तपासणीमध्ये नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तशय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा अशा आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून पुढील उपचारासाठी संदर्भित करणे तसेच दुभंगलेले ओट व टाळू, मोतीबिंदू, बहिरेपणा, जीवनसत्व अ ,ड, ब याची कमतरता, वाढ खुंटणे, लठ्ठपणा यांचाही शोध घेतला जात आहे.
आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या ४४ हजार १६ बालकांच्या तपासणीत प्राथमिक स्तरावर विविध आजारांनी ग्रासलेली ३ हजार ६६८ एवढी बालके आढळली आहेत. तसेच कमी व तीव्र कमी वजनाची (कुपोषित) सुमारे २ हजार मुले सापडली आहेत. या अभियान आरोग्य तपासणीत सापडलेल्या संशयित दुर्धर आजारी तसेच अन्य आजाराने ग्रासलेल्या मुलांची फेरतपासणी करून रोग निदान केले जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.

कोट
या अभियानाच्या नियोजनानुसार कालबद्ध पद्धतीने आठ आठवडे हे अभियान राबविण्यात येणार आहे. तर १५ मार्चपर्यंत सर्व बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ. सई धुरी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी