रत्नागिरी ः ‘कलाकार’ घडवण्यासाठी ’शोध कलारत्नांचा’

रत्नागिरी ः ‘कलाकार’ घडवण्यासाठी ’शोध कलारत्नांचा’

कलाकार घडवण्यासाठी ’शोध कलारत्नांचा’
जिल्हा परिषद शिक्षण विभाग; जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सहकार्यातून चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी, ता. २३ ः कलेचा उपयोग करमणुकीसाठी न करता करिअरसाठी करता यावा, हे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ‘शोध कलारत्नांचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मदत करणार आहे. चित्रकला स्पर्धेतून १४४ विद्यार्थी व ४५ शिक्षक निवडले जातील. त्यांच्या सहा कार्यशाळा घेतल्या जातील. या उपक्रमातून जिल्हा परिषदेने कलाकार घडवण्यासाठी पाऊल टाकले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यावर अधिक भर दिला आहे. याचा अवलंब रत्नागिरी जिल्हा परिषदेने केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कलारत्नांचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा नियोजनमधून याला निधी मिळणार असून, तसा प्रस्ताव दिला आहे. कलाकारांचा शोध घेण्यासाठी पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमध्ये कलाक्षेत्राची आवड असलेल्या निवडक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतील जाईल. त्यामधून तालुकानिहाय प्रत्येक गटातून चार अशी १६ बक्षिसपात्र चित्रांची निवड केली जाईल. त्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या तज्ञ परिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांबरोबरच बक्षीस न मिळालेले; परंतु कलेचे विशेष कौशल्य असलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांची कार्यशाळा होईल. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच कलाशिक्षक निवडण्यात येणार आहेत. हे शिक्षक ठरवून दिलेला कलाविषयक अभ्यासक्रम शाळांमध्ये राबवतील. कलेसाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, चित्रांच्या इमेजचा संग्रह करणे, वेळोवेळी मागितलेली माहिती संबंधितांपर्यंत पोहचवणे व विद्यार्थी उपस्थिती नोंदवणे ही कामे शिक्षक करतील. वर्षभरात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहा कार्यशाळा घेण्यात येतील. त्यातील दोन जिल्हास्तरावर तर चार तालुकास्तरावर होतील. यामध्ये ४५ मार्गदर्शक आणि बक्षिसपात्र १४४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद पुरवणार आहे.

---
चौकट

काय आहेत उद्दिष्ट
* विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्यांची ओळख करणे
* कलाक्षेत्रात नवनवीन संधींसाठी मार्गदर्शन करणे
* कला व कौशल्यात्मक व्यवसायाबद्दल माहिती देणे
* उपजीविकेसाठी वापर करण्याबाबत माहिती देणे
* लोककलेचा वारसा जपणे
* सुप्त कलागुणांना वाव देतानाच व्यक्तिमत्व विकास करणे

....

कोट
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मदतीने कार्यशाळांचे नियोजन केले आहे. त्यासाठी विद्यार्थी निवड केली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठवला आहे.
- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com