चिपळूण ः महामार्गालगतची गावे होणार विकसित

चिपळूण ः महामार्गालगतची गावे होणार विकसित

पान १ साठी


सागरी महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची तरतूद
लगतच्या गावांचा होणार विकास; राज्य सरकारने फुंकली पर्यटन विकासाची तुतारी
चिपळूण, ता. २३ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाच समांतर असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गासाठीही राज्य सरकारने ९ हजार ५७३ कोटींची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची तुतारी फुंकली. सागरी महामार्गालगत असलेली गावे, शहरे आता वेगाने विकसित होऊ शकतील.
रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर त्याला समांतर असलेल्या आणि कोकण पर्यटनाच्याद़ृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा ५४० कि. मी. लांबीचा रेवस-दिघी-जैतापूर-वेंगुर्ला-रेड्डी असा जाणारा सागरी महामार्ग अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. तीन जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनाऱ्याने जातो. विविध धार्मिक स्थळे, पर्यटनक्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आदी या महामार्गावर आहेत. त्यामुळे हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणारा आहे. ५४० कि.मी.चा हा मार्ग दुपदरी असणार आहे.
सागरी महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, रोहा, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या प्रमुख शहरांच्या विकासाच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्याचबरोबर मांडवा, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, कोर्लई, नांदगाव, मुरूड, दिघी, दिवे आगार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या पर्यटनस्थळांना सागरी पर्यटनाचे महत्त्व वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी ही प्रमुख शहरे व गणपतीपुळे, गणेशपुळे, पावस, नाणीज, आंबडवे या पर्यटनस्थळी अधिक विकास होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या शहरांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा होईल. कोकणातील तीन जिल्ह्यांत या महामार्गाने आर्थिक समृद्धी येणार आहे.
रेवस, अलिबाग, मुरूड, दिघी, हरिहरेश्वर, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर ४४ खाडी पूल, २१ मोठे पूल आणि २२ लहान पुलांचा समावेश आहे. रायगडमध्ये मुरूड, नांदगाव, आदआव, धारावी, रत्नागिरीत वेसवी, बाणकोट, वेळास, पालशेत, रिळ, शिरगाव, मालगुंड, कशेळी, आडिवरे या गावांपलीकडून रस्ता काढण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, कातवण, मिठबाव, केळुस, टाक व म्हापण या गावांत आहे. रस्त्याची देखभाल करण्याकरिता स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.


मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर रस्ते विकास महामंडळाने ज्याप्रमाणे नवनगरे विकसित केली त्याच धर्तीवर कोकणातही ऐतिहासिक, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्राचा विचार करून या मार्गावर नवनगरे विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर यांचा या विकसित होणाऱ्‍या नवनगरांमध्ये समावेश होणार आहे. म्हणजेच आतापर्यंत पर्यटनद़ृष्ट्या सक्षम असणारी मात्र विकासाच्याद़ृष्टीने काहीशी विकसित असणारी महामार्गावरील गावे, पर्यटनस्थळांना नवा आयाम मिळू शकेल.
- धीरज वाटेकर, पर्यटक अभ्यासक चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com