रत्नागिरी ः 46 प्रकल्पातून ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन

रत्नागिरी ः 46 प्रकल्पातून ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन

KOP२३L८४८८६- संग्रिहत

४६ प्रकल्पातून ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन

कांदळवन कक्ष ; सोनगाव येथे मगर सफारीला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. २३ ः कांदळवन व सागरी जैवविविधता संरक्षणाच्यादृष्टीने किनारी भागात कांदळवन कक्ष रत्नागिरी व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगटांच्या माध्यमातून ४६ विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यात जिताडा, कालवे, काकई पालनासोबत शोभिवंत मत्स्यपालन आणि निसर्ग पर्यटन प्रकल्पांचा समावेश आहे. यामधून स्थानिक ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात २०१९ पासून कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकल्प खाडीकिनारी राहणार्‍या ग्रामस्थांना सोबत घेऊन बचतगटांच्या माध्यमातून सुरू आहेत. गतवर्षी यातील काही बचतगटांनी कालवे, जिताडा व काकई पालन व अन्य माध्यमातून तब्बल साडेसात लाखांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. खाडीभागातील बॅकवॉटरच्या माध्यमातून कोकणातील निसर्गसौंदर्य न्याहाळता येत आहे. जगबुडी व वाशिष्ठी नदीपात्रात आढाळणार्‍या मगरींमुळे खेड सोनगाव येथे मगर सफारी सुरू करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांना बचतगटांच्या माध्यामतून एकत्र करून सुरू करण्यात आलेल्या पर्यटन सफारीलाही आता पर्यटकांचा पाठिंबा मिळत आहे. याच ठिकाणी ग्रामस्थांकडून कोकण पद्धतीने आदरातिथ्य होत असल्याने पर्यटकही भारावून जात आहेत. मगर सफारीबरोबरच विविध प्रजातीच्या पक्षांचे सौंदर्यही न्याहाळता येत असल्याने पर्यटकांसाठी ही मोठी निसर्ग मेजवानी कांदळवन प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात सध्या जिताडा पालनाचे सहा, काकई पालनाचे १३ प्रकल्प तर कालवे पालनाचे १३ प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. शोभिवंत मत्स्यपालनाचे नऊ प्रकल्प जिल्ह्यात सुरू आहेत. निसर्ग पर्यटनावर आधारित आंजर्ले सोनगाव येथे पाच प्रकल्प सुरू आहेत. प्रकल्प समन्वयकांच्या माध्यमातून खाडीकिनारी राहणार्‍या ग्रामस्थांना नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी प्रेरित केले जात आहे. पावस येथेही निसर्ग पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी कयाक बोट खरेदी केली जाणार असून, सर्व परवानग्या प्राप्त झाल्यावर हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

---
चौकट

बचतगटांना मिळाले ११ लाख उत्पन्न
गतवर्षी २८ बचतगटांना ७ लाख १९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. आंजर्ले व सोनगाव जवळपास २ लाखाचे उत्पन्न मिळाले. शोभिवंत मासे व अन्य माध्यमातून सर्व बचतगटांना ११ लाख २६ हजाराचे उत्पन्न मिळाले. यातून खर्च वजा करून बचतगटातील सदस्यांना पावसाळ्याचे दिवस सोडून हे उत्पन्न मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com