सदर ः सह्याद्रीच्या कुशीतील कोकणाचे सांस्कृतिक रखवालदार

सदर ः सह्याद्रीच्या कुशीतील कोकणाचे सांस्कृतिक रखवालदार

rat२४१७.txt

बातमी क्र. १७ ( टुडे पान २)

नवीन सदर आहे, (२३ फेब्रुवारी टुडे पान चार प्रमाणे लोगो करून घ्यावा)

संस्कृतीची पाळंमुळं लोककलेत .......लोगो


लोककला हा त्या त्या विशिष्ट प्रादेशिकतेचा लख्ख आरसा असतो. त्या भागातलं राहणीमान, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथलं निसर्गचक्र अशा अनेक गोष्टींच्या प्रभावाने लोककला संपन्न तर होतातच; पण त्याचबरोबर या कला सर्वसमावेशक राहतात आणि तरीही अभिजनांपेक्षा लोकजीवनाचं थेट प्रतिबिंब त्यांच्यामध्ये दिसून येतं. मुळात यामध्ये गायली जाणारी लोकगीतं, कथा हे केवळ मौखिक परंपरेने आजवर टिकून राहिलेलं आहे. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच लोकप्रकारांच्या लिखित संहिता आता अभ्यासकांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्या आहेत. कोकणच्या लोककलांमधला खणखणीत, दमदार आवाज आपल्याला अचंबित करतो.

- आसावरी देशपांडे, जोशी
---
सह्याद्रीच्या कुशीतील कोकणाचे सांस्कृतिक रखवालदार

सह्याद्रीच्या कुशीत राहणारे कोकणाचे सांस्कृतिक रखवालदार तशाच डोंगरी चढ्या पट्टीत गाणी गातात आणि त्यांच्या हातातली वाद्यं तशीच भारदस्त नाद करणारी असतात. संपूर्ण जगणं त्यांनी गाण्यातच मांडलं. रोजचा संघर्ष वाद्यांच्या गजरामध्येच त्यांनी सामावला आणि म्हणूनच कातकरी स्त्रिया गाणं गात जेव्हा बेभान नाचत होत्या तेव्हा त्या गात होत्या गाणं ''ये रे डुकरा पाण्यावरी!'' वाद्यांची वाढत जाणारी लय, डुकराचा मुखवटा घालून थिरथरणारा त्यांचाच एक सहकारी आणि नेम धरून त्याच्यावर बाण मारणाराही त्यांच्यातलाच एक. न राहवून मी विंगेतून ओरडले, मारू नको रेssssत्याला! कातकरणी नाचत होत्या, तेही त्यांच्या आयुष्यासारख्याच! त्यांच्या हालचाली, पदन्यास .... कशाकशालाच नेमकेपणा, थेटपणा नव्हता. जसं आयुष्य येतं तसं स्वीकारणं अपरिहार्य असतं त्यांच्यासाठी तसंच तो तो क्षण साजरा करणारं त्यांचं नृत्य! गावातल्या बायकांकडून शंभर विनवण्या करून मागून आणलेल्या नव्या काष्ट्याच्या साड्या नेसून आल्या होत्या. तिशी-पस्तिशीच्या त्या बायका साठीच्या वाटत होत्या. आयुष्यात जमा कसलीच नसलेल्या त्या बायका किती आग्रहाने डुकराला पाण्यावर बोलवत होत्या आणि माझ्या मनात भूतदया! किती ढोंगीपणा असतो नाही आपला? आपण (मी शाकाहारी असले तरी) मांसाहार केला तरी चालेल; पण त्यांनी डुकराला मारायचं नाही! खरंतर त्यांच्याएवढा निसर्गाचा समतोल आणखी कुणी साधला असेल!
कातकऱ्यांचं गाणं जसं अभावातल्या जगण्याचं, अगदी त्याच्या उलट गजोनृत्य! त्यातले शब्द, हाकारे, पुकारे, ढोल, घुंगराची काठी आणि कातळालाही भिडणारा उंच स्वर! जगण्यातली अस्थिरता, अभाव यांच्यावर चिवटपणाने मात करणाऱ्‍या धनगर समाजाचं हे वैशिष्ट्यपूर्ण नृत्य. यामध्ये लंगोटी, सदरा, त्यावर मेंढीच्या लोकरीचं जाकिट आणि डोक्याला मुंडासं, अशा पोषाखात असलेला एकजण खड्या आवाजात गाणं गात होता. त्याचा आवाज, त्यामधलं सामर्थ्य, धनगराची जिगिविषा ..... सगळं त्याच्या व्यक्तिमत्वातून दृग्गोचर होत होतं. विविध प्रकारच्या एनर्जी ड्रिंकने विकतही न मिळणारी पिळदार शरीरयष्टी, तुकतुकीत कांती त्या संपूर्ण समाजाला साकार करत होती. म्हणूनच लक्षात येतं की, एखाद्या समाजाचा परिचय, त्याचा भूतकाळ समजून घ्यायचा असेल तर त्यांच्यामधली गीतं, नृत्यं आणि रीतिरिवाज समजून घ्यावेत. अशातूनच समाजशास्त्राच्या आंतरिक जाणिवा प्रगल्भ होत जातात. असाच वैशिष्ट्यपूर्ण आणि तत्कालीन समाजव्यवस्थेचं दर्शन घडवणारा एक प्रकार म्हणजे, दापोली तालुक्यातल्या खेर्डी इथला काटखेळ! शिमग्यात ग्रामदेवतेच्या पालखीबरोबर काटखेळ करणाऱ्‍या काटखेळींना दारी येणाऱ्या देवाएवढंच महत्व असतं; पण काटखेळाचं हे महत्व यापुरतंच मर्यादित नाही. या खेळाला शिवकालाचे संदर्भ मिळतात. याचा विशिष्ट पोषाख, त्यामधली गाणी यांच्यामार्फत अनेक संकेतांची सहजी देवाणघेवाण केली जात असे. छत्रपतींच्या गनिमी काव्याइतकीच त्यांची संपर्क यंत्रणासुद्धा प्रबळ होती, हे सिद्ध करणारा हा एक पुरावा. समाज हा सदैव एखाद्या कणखर नेतृत्वाच्या प्रतीक्षेत असतो, हे अगदी खरं आहे. ''अभ्युत्थानमधर्मस्य'' अवतार घेणारा प्रत्येक महापुरुष तळागाळातल्या, सर्वसामान्यांना आपलासा वाटला पाहिजे. मानवाच्या इतिहासात लोकजीवनाने अशा प्रत्येक ''मसिहा''ला उत्स्फूर्तपणे आपलं नेतेपण बहाल केलं आहे. गोपालकृष्ण, श्रीराम ही तर सर्वसंमत उदाहरणं आहेत; पण अगदी चक्रधर स्वामींपासून आजच्या काडसिद्धेश्वर महाराजांपर्यंत लोकसहभागाचा प्रभाव आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.
सापाड ही लोककला आजही कोकणातल्या काही खेडेगावांमध्ये पूर्वीइतक्याच उत्साहाने साजरी होते. लोकजीवनाशी घट्ट जुळलेली नाळ या वेळी म्हटल्या जाणाऱ्या गीतांमधून सुस्पष्ट होते. भविष्यातल्या नवनिर्मितीचा आनंद यांच्या गाण्यात न येता तरच नवल. लोकअभिव्यक्तीने केवळ स्वतःच्या कष्टांचं, सोसण्याचं गाणं केलं असं मात्र नक्कीच नाही. उलट, आपल्या धारणा, आपल्या महाकथा, आपले संस्कार, आपल्या धर्मातल्या सनातन समजुती हे सर्व मातीशी घट्ट जोडून ठेवण्याचं काम या लोकमानसाने अविरतपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी पंडूच्या हिमालयात झालेल्या मृत्यूनंतर जोपर्यंत त्याची कुंभारक्रिया झाली नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळाली नाही, यावर ठाम विश्वास असणाऱ्या कोकणातल्या कुंभार समाजात आजही एखाद्याच्या मृत्यूपश्चात कुंभारक्रियेचा विधी केलाच जातो. चिपळूणच्या लोककला महोत्सवात ही कुंभार क्रिया सार्वजनिक ठिकाणी आजवर सर्वप्रथम सादर झाली एवढं तिचं पावित्र्य आणि महत्व या लोकांनी अबाधित ठेवलं आहे. पुनर्जन्माच्या संकल्पनेवर समाजात कितीही मतमतांतरं असली तरी या सारख्या उदाहरणांवरून संस्कृतीची पाळंमुळं किती घट्ट रोवलेली आहेत हे लक्षात येतं. यासाठी ग्रामीण लोकसमुहाने फार मोठा हातभार लावलेला आहे.

(लेखिका लोककलांची आस्वादक अभ्यासक आहे.)
--------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com