
देवगडसाठी ६१ कोटींच्या नळ योजनेचा आराखडा
85001
देवगड ः शहरासाठी प्रस्तावित नळयोजनेचा संभाव्य आराखडा.
देवगडसाठी ६१ कोटींच्या नळ योजनेचा आराखडा
जीवन प्राधिकरण; कोर्ले-सातंडी धरणातून पुरवठा
देवगड, ता. २४ ः येथील देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी सुमारे ६१ कोटी रूपये खर्चाची कोर्ले-सातंडी धरण प्रकल्पावरून संभाव्य स्वतंत्र नळयोजना सुचवण्यात आली. या संभाव्य नळयोजनेचा आराखडा आणि त्यातील संभाव्य खर्च याची माहिती जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता राजेंद्र मेस्त्री यांनी नगरसेवकांना दिली.
येथील नगरपंचायत सभागृहात श्री. मेस्त्री यांनी संभाव्य योजनेविषयी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे, सभापती संतोष तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी तसेच नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरूल यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. देवगड जामसंडे शहरासाठी भविष्यात स्वतंत्र नळयोजना असावी, याबाबत अनेक पातळीवर चर्चा झाली होती. त्यानुसार विविध पर्याय यापूर्वी मांडण्यात आले होते. शिरगाव पाडाघर उद्भवावरून स्वतंत्र योजना असावी, असाही सूर होता. दरम्यान, भाजप नगरसेवकांनी योजना मंजूरीबाबत चर्चा करून प्रयत्न करण्याला काही कालावधी जाईल, असे सांगितले. यावेळी संभाव्य योजनेचा आराखडा श्री. मेस्त्री यांनी दाखवून त्यावर चर्चा केली.
--
विविध तीन योजनांचे पर्याय
श्री. मेस्त्री यांनी विविध तीन योजनांचे पर्याय सुचवले. त्यानुसार शिरगाव पाडागर उद्भवावरून स्वतंत्र योजना करावयाची झाल्यास त्याला सुमारे ५४ कोटी इतका संभाव्य खर्च अपेक्षित आहे तर कुर्ली घोणसरी येथून योजना प्रस्तावित केल्यास सुमारे ७५ कोटी ६२ लाख खर्च अपेक्षित आहे. याला पर्याय म्हणून कोर्ले-सातंडी धरणावरून योजना प्रस्तावित केल्यास सुमारे ६१ कोटी खर्च अपेक्षित आहे. कोर्ले सातंडी धरणावरून योजना करणे सोयीचे होईल. मात्र, त्यादृष्टीने मंजूरीसाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत व्यक्त करण्यात आले.