
वाफोली धरणानजीक रस्त्याचे काम अपूर्ण
85008
बांदा ः वाफोली धरणानजिक रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. (छायाचित्र नीलेश मोरजकर)
वाफोली धरणानजीक
रस्त्याचे काम अपूर्ण
अपघातांत वाढ; तत्काळ दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः पुणे, मुंबई येथून गोव्यात जाण्यासाठी जवळचा रस्ता असलेल्या व पर्यटकांच्या वाहनांची सातत्याने वर्दळ असलेल्या बांदा-दाणोली मार्गावरील वाफोली धरणानजिक उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
याठिकाणी पुलाची उंची वाढवून नव्याने काम करण्यात आले आहे. उभारण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता हा अद्यापही अपूर्ण आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी धुरळा व खड्यांमुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी कल्पना देऊनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभाग अजून किती अपघातांची वाट बघत आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. अपघात होऊन नाहक बळी गेल्यास संबंधित विभाग जबाबदार असेल. तत्पूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता डागडुजी करून पूर्ण वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारक यांनी केली आहे.