
देवगड नगरपंचायत सभेत शिलकी अंदाजपत्रक सादर
देवगड नगरपंचायत सभेत
शिलकी अंदाजपत्रक सादर
नगरसेवकांनी सुचवल्या दुरुस्त्या
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीचे २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचे सुमारे २६ कोटी ५२ लाख ३४ हजार रूपये जमेचे आणि २५ कोटी ३२ लाख २९ हजार रूपये खर्चाचे आर्थिक अंदाजपत्रक आजच्या सभेत सादर करण्यात आले. सुमारे १ कोटी २० लाख ५ हजार रूपये इतके शिलकीचे अंदाजपत्रक मांडण्यात आले. दरम्यान, मागील सुमारे ६ कोटी २४ लाख ३३ हजार ७९ रूपये इतकी आरंभी शिल्लक असल्याने एकूण सुमारे ७ कोटी ४४ लाख ३८ हजार ७९ रूपये इतके शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये काही दुरूस्ती सुचवण्यात आली.
नगरपंचायतीची सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे, सभापती संतोष तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी उपस्थित होते. सभेत पुढील आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये ४ कोटी ८ लाख १४ हजार रूपये महसूली जमा आणि २२ कोटी ४४ लाख २० हजार भांडवली जमा असे एकूण २६ कोटी ५२ लाख ३४ हजार रूपये जमा होतील. त्यातून ४ कोटी ७२ लाख ९ हजार रूपये महसूली आणि २१ कोटी २५ लाख भांडवली मिळून एकूण २५ कोटी ३२ लाख २९ हजार रूपये खर्च होऊन सुमारे १ कोटी २० लाख ५ हजार रूपये शिल्लक राहतील, असे मांडण्यात आले. मागील ६ कोटी २४ लाख ३३ हजार ७९ रूपये इतकी आरंभी शिल्लक असल्याने एकूण ७ कोटी ४४ लाख ३८ हजार ७९ रूपये इतके शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी विभागवार तरतुदी, त्यातील संभाव्य जमा तसेच खर्च याबाबतचे वाचन करण्यात आले. त्यावर विरोधी नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरूल यांनी चर्चा घडवली. आपल्या काही सुचना तसेच तरतुदींमधील बदल सुचवले. त्यानुसार अंदाजपत्रकातील काही आकडे बदलू शकतात.