रत्नागिरी- ठेकेदाराला मारहाण, मिऱ्या बंधाऱ्याचे काम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ठेकेदाराला मारहाण, मिऱ्या बंधाऱ्याचे काम बंद
रत्नागिरी- ठेकेदाराला मारहाण, मिऱ्या बंधाऱ्याचे काम बंद

रत्नागिरी- ठेकेदाराला मारहाण, मिऱ्या बंधाऱ्याचे काम बंद

sakal_logo
By

-rat24p44.jpg
85116
रत्नागिरी ः ठेकेदाराला मारहाण झाल्यानंतर मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने बंद करून मशिनरी वरती काढल्या आहेत.

मिऱ्या बंधाऱ्याचे काम बंद

स्थानिकांशी वाद; ठेकेदाराला मारहाण

रत्नागिरी, ता. २४ : अनेक वर्षांपासून मिऱ्यावासीयांची मागणी असलेल्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मोठ्या प्रयत्नांनी सुरू झाले असले तरी त्याला खो बसला आहे. काही स्थानिकांनी अज्ञात कारणावरून ठेकेदारांपैकी एकाला मारहाण केल्याचा आरोप ठेकेदाराने केला असून, त्यामुळे ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम दुपारपासून बंद ठेवल्याचे सांगितले. सर्व मशिनरी वर काढून ठेवल्या आहेत. उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आज दुपारी ठेकेदारांपैकी काहींशी स्थानिकांचा वाद झाला. या वादातून एक व्यक्तीने एका ठेकेदाराला मारहाण केली. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे अखेर ठेकेदाराने आज दुपारी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम थांबविले आहे. बंधाऱ्यावर असलेल्या सर्व मशिनरी किनाऱ्यावर आणल्या आहेत. याबाबत काही स्थानिकांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, कोणत्या तरी विषयावरून ठेकेदाराला मारहाण झाल्यामुळे त्याने काम बंद केले आहे. सकाळी काम सुरू होते. दुपारनंतर काम बंद केले आहे.
गेली चाळीस वर्षे भिजत पडलेला मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मिऱ्याच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या बंधाऱ्याला १६३ कोटी रुपये मंजूर झाले. दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची प्रचंड धूप होते. अजस्र लाटांनी बंधाऱ्याला गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन पावसाळ्यात त्यांना रात्र जागून काढावी लागते. आतापर्यंत बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सुमारे साडेतीन किमीच्या या बंधाऱ्याचे कायमस्वरुपी पक्क्या बंधाऱ्यात रुपांतर व्हावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन शासनाने बंधारा मंजूर केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाला दोन वर्षांची मुदत दिली आहे. त्यांपैकी काही महिने काम बंद असल्याने ठेकेदाराला दंडही झाला. आता हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे १५०० मीटरचे काम प्रगतिपथावर असल्याचे पत्तन विभागाने सांगितले. त्यानंतर मूळ आराखड्याप्रमाणे हे काम नाही, निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निवेदन एका शिष्टमंडळाने दिले.
आता काम वेगात सुरू आहे. काही स्थानिक मंडळी या कामावर लक्ष ठेवून आहेत.

-------------

कोट...
आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलो आहोत. तक्रार दाखल करणार असून धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम बंद ठेवणार आहोत.
- समीर पवार, ठेकेदार.