शिरोडा बाजारपेठेत सात दुकाने खाक

शिरोडा बाजारपेठेत सात दुकाने खाक

85122, 85123, 85124
शिरोडा ः येथील बाजारपेठेत तिठा येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत जळालेली दुकाने. (सर्व छायाचित्रे ः दीपेश परब)

शिरोडा बाजारपेठेत सात दुकाने खाक
सुमारे ४५ लाखांचे नुकसान; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः शिरोडा बाजारपेठत तिठा येथे आज दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे सात दुकाने भस्मसात झाली. यात सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे पूर्ण बाजारपेठ हादरली.
अचानक लागलेल्या आगीमुळे एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. येथील फोमेंतो कंपनीचे पाण्याचे टँकर घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्याचबरोबर वेंगुर्ले नगरपरिषद आणि कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाचा वापर करून सायंकाळी आगीवर नियंत्रण आणण्यात आले. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
तेथील सुमित चव्हाण यांच्या चप्पल दुकानातून दुपारी दीडच्या सुमारास सगळ्यात आधी धूर येऊ लागला. यामुळे स्थानिकांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ दुकान उघडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र दुकाने फार जुनी आहेत. यात लाकडाचाही मोठा वापर आहे. दुकाने एकमेकांना खेटून आहेत. वाऱ्यामुळे आग आजूबाजूला पसरली. बाजूच्या आणखी सहा दुकानांमध्ये आग पोहोचली. ग्रामस्थांनी तत्काळ दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. मिळेल त्या साहित्याने आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु केले. स्थानिकांनी रेडी मायनिंग येथे असलेल्या फोमेंतो कंपनीचे पाण्याचे टँकर मागविले. टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले; मात्र आग एवढी भीषण होती की आटोक्यात आणणे अशक्य होत होते. आगीचा भडका वाढतच होता. अखेर वेंगुर्ले नगरपरिषदेचा आणि कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला. तो दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले.
आगीत नारायणी पेंट्स, सुमित चव्हाण चप्पल दुकान, साईश नाटेकर कॉस्मेटिक शॉप, अजित आरावंदेकर यांची सिया मोबाईल शॉपी, सुशील नाटेकर यांचे किराणा दुकान, डॉ. प्रसाद साळगावकर यांचा दवाखाना, राजा खान सायकल स्टोअर यांचे दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच जिल्हा परिषद माजी सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, उद्योजक भाई मंत्री, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर, शिरोडा ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, माजी उपसरपंच राहुल गावडे, प्रवीण धानजी, आरवली सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच चंदन हाडकी, सदस्य मयुरेश शिरोडकर, हेतल गावडे, अर्चना नाईक, नंदिनी धानजी, पांडुरंग नाईक, प्रथमेश परब, रश्मी डीचोलकर, भाजपचे अमित गावडे, शिवसेनेचे कौशिक परब, किरण पालयेकर, समीर आरोस्कर, संतोष अणसुरकर, समीर कांबळी यांच्यासाहित लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार आर. व्ही. दळवी, पोलिस नाईक किरण पिळगांवकर, उपनिरीक्षक जाधव यांनी गर्दीवर नियंत्रण केले. नुकसानग्रस्त दुकान मालकांना विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी विशाल सेवा फाउंडेशनतर्फे तत्काळ रोख मदत जाहीर केली. नुकसानग्रस्तांना शिरोडा व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्याकडून आर्थिक सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दवाखान्यालाही मोठी झळ
शिरोडा बाजारपेठत डॉ. अमित प्रभूसाळगावकर यांचा दवाखाना आहे. ते, दुपारी दोनच्या सुमारास दवाखाना बंद करून घरी गेले होते. आग लागल्याचे समजताच त्यांनी धाव घेतली. दवाखान्यापाशी येत जेवढे शक्य होईल तेवढे सामान बाहेर काढले; मात्र, आगीत ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ईसीजी मशीन, एसी, औषध, संगणक जाळून खाक झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दवाखान्याची डागडुजी केली होती. यात ६ ते ७ लाखाचा खर्च झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com