
कुडाळ गॅस स्फोट
स्फोटसद्श्य आवाजाने
लक्ष्मीवाडी हादरली
कुडाळ ता २४ ः कुडाळ लक्ष्मीवाडी येथे उभारलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या गॅस स्टेशनमधून हवेची तपासणी करत असताना लक्ष्मीवाडी येथील आळवे यांच्या घरासमोर स्फोट झाला. त्यामुळे लक्ष्मीवाडी हादरली. स्फोट हवेचा असला तरी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने टाकलेली पाईपलाईन फुटल्यामुळे झाला. दरम्यान स्थानिक नागरिक आणि ठेकेदारांमध्ये वादावादी झाली आणि हा प्लांट वाडीमध्ये नको, अशी मागणी नागरिकांनी केली.
कुडाळ लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस स्टेशन उभारण्यात आले आहे. या गॅस स्टेशनची जोडणी आज करण्यात आली. गॅस पुरवठा करण्यापूर्वी घेतली जाणारी हवेची तपासणी करत असताना संध्याकाळी लक्ष्मीवाडी येथील आळवे यांच्या घरासमोरील पाईपलाईन हवेच्या दाबाने फुटली आणि मोठा आवाज झाला. या आवाजाने लक्ष्मीवाडी हादरली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात स्थानिक नागरिक नागेश नेमळेकर यांनी सांगितले की, गॅस सुरू करण्यापूर्वी हवेची तपासणी करताना पाईपलाईन फुटली तसेच पाईपलाईन सुमारे अडीच ते तीन फूट जमिनीखाली गेली पाहिजे; मात्र ती एक फुटाच्या आत आहे अशाप्रकारे भविष्यात गॅस सुरू झाला तर नागरिकांना धोकादायक ठरणार आहे हा गॅस स्टेशन या ठिकाणाहून हलवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती मात्र राजकीय दबावामुळे हे काम मार्गी लावण्यात आले आहे.
गॅस पाईपलाईनचे ठेकेदार आनंद शिरवलकर घटनास्थळी दाखल झाले. ते म्हणाले, ‘‘गॅस पाईपलाईनमध्ये असलेल्या कचऱ्यामुळे पाईपलाईन फुटलेली आहे. भविष्यात त्याचा कोणताही धोका होणार नाही. यासंदर्भातील सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत. हा केंद्राचा प्रकल्प असून लोकांना स्वस्त दरात गॅस मिळणार आहे. यावेळी राकेश नेमळेकर, श्री पाटकर, नगरसेविका चांदणी कांबळी, श्री आळवे आदी उपस्थित होते.