भरलेल्या वर्गात छपराची कैची तुटते तेव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरलेल्या वर्गात छपराची कैची तुटते तेव्हा...
भरलेल्या वर्गात छपराची कैची तुटते तेव्हा...

भरलेल्या वर्गात छपराची कैची तुटते तेव्हा...

sakal_logo
By

85191
कुणकेरी ः येथील शाळेच्या इमारत छपराची कैची तुटल्याने छप्पर धोकादायक बनले आहे.
85192
कुणकेरी ः कैची तुटून शाळेच्या भिंतीलाही तडे गेले.


भरलेल्या वर्गात छपराची कैची तुटते तेव्हा...

कुणकेरीतील प्रकार; धोकादायक इमारत सोडवण्यासाठी ग्रामस्थ एकवटले

सावंतवाडी, ता. २५ ः वर्ग भरला होता; शिक्षक शिकवत होते आणि अचानक छपरावर लटकलेला पंखा खाली आला. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येताच शिक्षकांनी तातडीने प्रसंगावधान राखत मुलांना शाळा इमारतीबाहेर काढले. नंतर निरखून पाहिले असता समोर आलेला प्रकार भयंकर होता. लाकडी कैची तुटून छप्पर लटकत होते आणि याच्या दाबाने भिंतीलाही तडे गेले होते. हा प्रकार कुणकेरी शाळा क्रमांक ३ मध्ये घडला. आता पावसाळा तोंडावर असताना पाचवीचा वर्ग बसवायचा कुठे, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत यातून तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या शालेय बांधकाम समितीने ही माहिती दिली.
बांधकाम समितीचे अध्यक्ष मंगेश केशव सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिलेल्या माहितीनुसार, कुणकेरीतील शाळा क्रमांक ३ मध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग असून पटसंख्या २१ आहे. या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेसाठीची इमारत चाळीस वर्षांपूर्वी अल्पबचत हॉल म्हणून उभारण्यात आली होती. लाकडी छप्पर, त्यावर कौले आणि विटांच्या भिंती अशी याची रचना आहे. सोमवारी (ता. २०) नेहमीप्रमाणे शाळा भरली. वर्ग सुरू होते. अचानक छतावर बसवलेला आणि सुरू असलेला पंखा खाली आला. हा प्रकार विचित्र वाटल्याने शिक्षकांनी तातडीने मुलांना वर्गाबाहेर काढले. आत जाऊन पाहिले असता छताला असलेली लाकडी कैची अचानक तुटली होती. यामुळे छताचा तोल बिघडून याचा दाब भिंतीवर आला होता. यामुळे भिंतीला तडे गेले. हा प्रकार इतक्यावरच थांबला असल्याने अनर्थ टळला; मात्र आता या इमारतीच्या आजूबाजूला जाणेही धोकादायक झाले आहे. शाळेने याची माहिती संबंधित यंत्रणांना तसेच सरपंच व ग्रामस्थांना दिली. आता ग्रामस्थ या इमारतीची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून एकवटले आहे. ग्रामस्थ आणि पालकांची तातडीची सभा घेण्यात आली. यात हा प्रश्‍न सोडविण्यासाठी शालेय बांधकाम समिती स्थापन करण्यात आली. या सभेत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन यातून मार्ग काढावा, अशी मागणी केली. भिंतीला पूर्णपणे तडे गेले आहेत. खिडक्यांवरील छावण्या तुटल्या आहेत. छपराला लावलेले तीर लाकडातून सुटले आहेत. यामुळे ही इमारतच धोकादायक बनली आहे. त्यामुळे ही इमारत निर्लेखित करून तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देऊन यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
...............
चौकट
वर्ग कुठे भरवायचे?
या शाळेत २१ पटसंख्या असून पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. सद्यस्थितीत इमारत धोकादायक बनल्याने सुरक्षित असा एकच वर्ग उपलब्ध आहे. त्यात सर्व साहित्य, टेबल, खुर्च्या, कपाट ठेवून आणखी पाच वर्ग बसविणे अशक्य आहे. अशा स्थितीत पावसाळ्याच्या तोंडावर शाळा कुठे भरवायची, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यातून मार्ग काढावा, अशी मागणी शालेय बांधकाम समिती अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली.
..................
कोट
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ती वाढविण्यासाठी प्रशासन, शिक्षक प्रयत्न करतात; मात्र दुसरीकडे भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष हा विरोधाभास आहे. शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी दर्जेदार शिक्षणासह सुरक्षित, चांगल्या भौतिक सुविधाही आवश्यक आहेत. याचा विचार करून तातडीने या शाळा इमारतीबाबत तोडगा काढावा.
- मंगेश सावंत, अध्यक्ष, शालेय बांधकाम समिती, कुणकेरी शाळा क्रमांक ३