
विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
85219
साटेली ः येथील शेतविहिरीत पडलेला बिबट्या.
विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
साटेलीतील प्रकार; वन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः तालुक्यातील साटेली-खालचीवाडी भागातील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना आज सकाळी घडली. हा बिबट्या रात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती सावंतवाडी वन विभागाला आज सकाळी मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल बिबट्याच्या सुटकेसाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता विहिरीत पूर्णवाढ झालेला अंदाजे अडीच वर्षे वयाचा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असे निदर्शनास आले. बिबट्या विहिरीत पाईपच्या साहाय्याने लोंबकळत राहिला होता. त्याला तरंगण्यासाठी तात्काळ लाकडाचा ओंडका विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी लाकडांचा आधार दिलेली शिडी विहिरीत सोडण्यात आली. त्या शिडीचा आधार घेऊन बिबट्या यशस्वीरित्या विहिरीच्या बाहेर आला. बाहेर पडताच त्याने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली. या बचाव मोहिमेत सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नागेश खोराटे, आप्पासाहेब राठोड, संग्राम पाटील, प्रकाश रानगिरे, महादेव गेजगे, बबन रेडकर, श्री. पडते यांनी सहभाग घेतला. त्यांना स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.
--
बिबट्याचे जतन करा
बिबट्या हा अन्नसाखळीतील वरच्या स्तरातील प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या कोकणातील या ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांनी वन विभागास असेच सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी क्षीरसागर यांनी यावेळी केले.