चिन्ह चोरले तरी आत्मा तिथेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिन्ह चोरले तरी आत्मा तिथेच
चिन्ह चोरले तरी आत्मा तिथेच

चिन्ह चोरले तरी आत्मा तिथेच

sakal_logo
By

L85242
कुडाळ : उद्धव ठाकरे गटाच्या ‘शिवगर्जना’ शिवसंवाद कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई. व्यासपीठावर वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

चिन्ह चोरले तरी आत्मा तिथेच
सुभाष देसाई : मशाल घेऊन विरोधकांना पळविणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः तुम्ही चिन्ह चोरले, धनुष्यबाण खेचून घेतला; पण आत्मा तिथेच राहिला. जनता जागेवरच राहिली. यापुढे आम्ही मशाल घेऊन तुम्हाला पळवून लावू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना दिला.
ठाकरे गटातर्फे राज्यभरात ''जिंकेपर्यंत लढायचे'' हे ब्रीदवाक्य घेऊन शिवगर्जना शिवसंवाद यात्रा सुरू आहे. जिल्ह्यातील पहिली सभा सकाळी येथे झाली. सभेला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, प्रदीप बोरकर, राजन नाईक, बबन बोभाटे, जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, मिलिंद नाईक, स्नेहा परब, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘शिवसेनेबद्दल कायकाय झाले, हे सर्वांना माहिती आहे. पक्षाचे नाव गेले, बाणाची चोरी झाली; पण कार्यकर्ते जाग्यावर राहिले आणि आत्मा तिथेच आहे. प्राणाला हात घालू शकत नाही. ‘मनात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या सत्ता काळात हातभार लागला. उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी गोव्यात बैठक घेतली. वीस उद्योगपतींनी जागा बुक केल्या. आडाळीसाठी आमच्या काळात जी गती होती, ती आता या सरकारच्या काळात कासवगती झाली. काथ्या उद्योग आणला. पर्यटनाला उद्योजकाचा दर्जा दिला. उद्योग व शिक्षण दोन्ही वाढण्यासाठी प्रयत्न केले. बाहेरून उद्योग यावेत म्हणून प्रयत्न केले; मात्र या नतद्रष्ट सरकारने उद्योगधंद्यासाठी उलटे गालीचे घालून उद्योग बाहेर नेले. उद्धव ठाकरे यांचे सरकार पायउतार झाल्याचे दु:ख सर्वसामान्य समाजाला झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्री झालेले बघायच आहे. यासाठी जिंकेपर्यंत सर्वांना लढायचे आहे आणि ''मिंधे'' सरकार भुईसपाट करायचे आहे.’’
ते म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेत १४० जागा सेनेच्याच येतील. एका सर्वेक्षणात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार, हे पुढे आले असून त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बैठका घेण्यात, चिंतन करण्यात अडकले आहेत.’’
आमदार नाईक म्हणाले, ‘‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहोत. किती कारवाई झाल्या तरी डगमगणार नाही. जिल्ह्याचा विकास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाला. नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही त्यांनी काहीच विकास केला नाही.’’ पडते म्हणाले, ‘‘शिवसैनिक एकनिष्ठ आहेत.’’ दुधवडकर, बोरकर, रावराणे, सौ. सावंत यांची भाषणे झाली. अमरसेन सावंत यांनी आभार मानले. यावेळी बाळा कोरगावकर, सचिन कदम यांची संघटनेच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.
कोट
आता जनता संधीची वाट बघत आहे. ती पळपुट्यांना तुडवून मारेल आणि ''मिंधे'' सरकारचे मनसुबे धुळीला मिळवेल. पुन्हा एकदा सर्वत्र भगवा फडकवेल. यापुढे जिल्ह्यातील तिन्ही आमदार शिवसेनेचे आणायचे आहेत. आमदार नाईक यांना योग्य वेळी संधी दिली जाईल.
- सुभाष देसाई, ज्येष्ठ नेते, ठाकरे गट