
समग्र शिक्षांतर्गत स्वरक्षणाचे धडे
01377
समग्र शिक्षांतर्गत स्वरक्षणाचे धडे
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींसाठी उपक्रम
मुंबई, ता. २५ ः समग्र शिक्षांतर्गत राज्यातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण (प्राथमिक आणि माध्यमिक) अंतर्गत मुंबई महापालिकेच्या १०१७ शाळा आणि डी.वाय.डी.च्या आठ शाळांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी समग्र शिक्षांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.
विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. मुंबई प्रकल्प समग्र शिक्षा अधिकारी राजेश कंकाल, उपशिक्षणाधिकारी मालती टोणपे, अधिक्षक नंदू घारे तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पूनम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाद्वारे मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम बनवण्याची गरज आहे, जेणेकरून त्या संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण करू शकतील. हिंसाचार करणाऱ्यांना संदेश देण्यासाठी मुली मुकाबला करण्यासाठी तयार आहेत आणि या संदर्भात मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयं कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागरूकता विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाने सांगितले.
--
असे असेल प्रशिक्षण
- साधारण १०० तासांचे प्रशिक्षण होणार.
- प्रशिक्षण शाळेच्या वेळेतच होणार.
- नियमित शिक्षक समन्वयक असतील
- प्रशिक्षण ताणविरहित वातावरणात होणार.
- विद्यार्थिनींच्या सुरक्षितेबाबत योग्य ती दक्षता घेतली जाणार.