रत्नागिरी-सदर संस्कृतीची पाळंमुळं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सदर संस्कृतीची पाळंमुळं
रत्नागिरी-सदर संस्कृतीची पाळंमुळं

रत्नागिरी-सदर संस्कृतीची पाळंमुळं

sakal_logo
By

संस्कृतीची पाळंमुळं लोककलेत .......लोगो

इन्ट्रो
---
फेब्रुवारी २०२३च्या पहिल्या आठवड्यात चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर व अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लोककला, पर्यटन आणि कोकणी खाद्य महोत्सव साजरा झाला. लोककलांमधील रसरशीतपणा, प्रामाणिकपणा, लोकरितींचे त्यात पडणारे प्रतिबिंब आणि आरपार प्रामाणिकपण उत्स्फूर्ततेतून उमटलेला आविष्कार यामुळे रसिकांसाठी हा महोत्सव अविस्मरणीय आणि अंतर्मुख करणारा कसा ठरला, यावरील भाष्याचा हा अंतिम भाग.
.....................
- आसावरी देशपांडे-जोशी
----------------------------------

कपटुल्या रावणा रे कपटुल्या रावण्णा

चित्रकथी ही अशीच एक मौखिक परंपरेने आपली महाकाव्यं जपणारी एक लोककला! रामायण, महाभारतातल्या कथांनी लोकजीवनाला फार आपलंसं केलेलं तर आहेच; पण त्यामध्ये आपल्या स्वतःच्या धारणांचा सहजसुंदर मेळही घातलेला आहे. ''राम हलक्या दिलाचा, नाही सीतेच्या तोलाचा'' असं अतिशय धीटपणे लोकसंस्कृती सांगते. तेव्हा त्यातला ठामपणा आपल्याला अंतर्मुख करतो. चित्रकथीसारख्या लोककलेमधून या अशाच कथा लोकसंस्कृतीचं लेणं घेऊन आपल्यासमोर गायल्या जातात. आज दुर्दैवाने चित्रकथीसाठी ती विशिष्ट चित्रं काढणारी शेवटची पिढी अस्तंगत होत आहे.
कोकणातल्या लोककलांमध्ये सर्वाधिक लिहिलं गेलं ते दशावताराबद्दल! प्रत्येक पात्राने स्वतःच केलेला वैशिष्ट्यपूर्ण मेकअप्, उठावदार वेशभूषा, पुरुषांनी साकारलेल्या स्त्रीभूमिका, उघड्या रंगमंचावर सादर होत असताना शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे सुस्पष्ट संवाद या सगळ्याबरोबर दशावताराचा आणखी एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे जीवनमूल्यांची सबळ जपणूक करणारी अलिखित कथा! यामध्ये कथा ठरते, पात्ररचना निश्चित होते आणि मग प्रत्यक्ष प्रयोगाच्यावेळी उत्स्फूर्तपणे संवाद बोलले जातात. दशावतार रंगत जातो. प्रत्येक कथेला सुष्टांनी केलेल्या दुष्टांच्या संहाराबरोबरच संस्कारांची शिदोरी प्रेक्षकांना सोबत द्यावी लागते. चिपळूणच्या लोककला महोत्सवात पारंपरिक दशावतार तर सादर झालाच; पण महिलांनी सादर केलेला दशावतारसुद्धा उल्लेखनीय होता.
या सगळ्या लोककलांमधला एक समान दुवा वाटला तो म्हणजे त्यांच्यामधली ग्रामीण बोली आणि गोडी! नमन ही तर अस्सल ग्रामीण बाज जपणारी लोककला. इथेही झांज वाजवत एकजण रामायण महाभारतातली एखादी कथा कीर्तनकाराच्याच प्रासादिक पद्धतीने पण गाण्यामध्ये सांगत असतो. बाजूचे सहकारी मृदुंग, टाळ यांच्या साथीने कथा उत्तरोत्तर फुलवत नेतात. इथेही केवळ स्मरणशक्ती आणि उत्स्फूर्तता! स्त्री वेषातला एखादा पुरुष कौसल्या झालेला असतो आणि तान्ह्या रामाला झोपवताना ''मनमोहना, दशरथनंदना, बाळा जो जो रे'' असं पुरुषी आवाजात आळवत असतो; पण फार गोड वाटतं ते कानाला! कारण, यातले उच्चार आपल्याला लोकसंस्कृतीचं रसरशीत,अकृत्रिम दर्शन घडवतात. इथे जो जो मधला ''जो''चा उच्चार जोशमधल्या ''जो'' सारखा असतो. अयोध्या नगरी नसून ती ''आयोदा'' नगरी असते. मिथिला नगरी ''मिथुला'' असते आणि त्राटिका तर ''ताटको'' असते. इतक्या गोड नावाची मुलगी राक्षसीण कशी असू शकते, हा प्रश्न आपल्या मनात रेंगाळत ठेवते ती ही लोककला!
नमनामध्ये एखादं महत्वाचं सोंग आणलं जातं. चिपळूणला रावणाचं आख्यान होतं आणि त्याप्रमाणे रावणाने दमदार एन्ट्री केली. ''आहा रे जनकराजा'' आणि ''आहा रे लंकाधीशा'' इथपासून सुरू झालेला संवाद शेवटी ''कपटुल्या रावणा रे कपटुल्या रावण्णा'' इथे येऊन संपतो आणि मला वाटतं, हेच लोककथेचं वैशिष्ट्य आहे. राम, रावण, कैकयी, मंथरा .... आपल्याच मनातल्या भावभावना असतात या! एकाच व्यक्तीच्या ठायी या सगळ्या वृत्ती कमी-अधिक प्रमाणात किंवा प्रसंगोपात असतातच आणि यालाच लोककलांमध्ये लोकमान्यता मिळालेली दिसून येते. त्यामुळेच जितका जयघोष रामाचा, लोककथेत श्रीराम नसतो बरं, तो नुसताच राम असतो तर जितका जयघोष रामाचा तेवढंच महत्व रावणालाही असतं. म्हणून तर रावणाची वाईट वृत्ती स्वीकारून त्यालाही ''कपटुल्या'' ही गोड साद घालण्याएवढं मोठं मन लोकमानसाने सांभाळलेलं दिसतं. मला लोककलांमधून दिसणारा चांगल्या-वाईट सगळ्याच भावनांचा स्वीकार, भावनांचा निर्मळपणा फार भावतो. समाजाची परिपूर्णता लोककलांनी सर्वार्थाने जपली आहे आणि त्यामुळेच रावणावरून रंगमंचावरच उतरवून टाकलेला नारळ खूप काही सांगून जातो. रावणाची एक्झिट झाली की, त्याच्याएवढ्याच वेगाने नारळ उतरवणारा त्याच्या मागोमाग बॅकस्टेजला जातो. नारळाचा डोळा फोडून त्यातलं पाणी रावणाची भूमिका करणार्‍या नटाला देतो. दहा तोंडांचा अवजड लाकडी मुखवटा सांभाळत रावण साकारणं ऐर्‍यागैर्‍याचं काम नाही. नारळाच्या पाण्याने त्याला एनर्जी तर मिळतेच; पण त्यापेक्षाही मला फार फार आवडलं ते त्याच्यावरून नारळ उतरवणं. हे रंगमंचापुरतं सोंग आहे; पण ही रावणी मानसिकता तुझ्या मनात यापुढे राहू नये, ही बाधा नाहीशी व्हावी हे त्या नटाला समजावून सांगणं हाच तर यामागचा उद्देश नसेल?
लोककला महोत्सवाने आपल्या पोषाखीपणाचा बेगडीपणा तीव्रतेने जाणवला. कधीतरी ही पोषाखीपणा उतरवता आला पाहिजे, कधीतरी या सगळ्यांसारखं निर्मळ जगता आलं पाहिजे.( समाप्त)
(लेखिका लोककलांची आस्वादक अभ्यासक आहे.)