आरोग्य यंत्रणा सक्षम करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य यंत्रणा सक्षम करणार
आरोग्य यंत्रणा सक्षम करणार

आरोग्य यंत्रणा सक्षम करणार

sakal_logo
By

85387
सांगेली ः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करताना तुकाराम राऊळ. शेजारी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

आरोग्य यंत्रणा सक्षम करणार

दीपक केसरकर; सांगेली आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जिल्हा दौऱ्यावर घेऊन येणार आहे. आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे भरून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दरीतून तब्बल एक कोटी रुपये खर्चून सांगली प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळ्यात मंत्री केसरकर यांनी मुंबईवरून ऑनलाईन संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या इमारतीसाठी ज्यांनी जमीन दिली, त्या राऊळ कुटुंबियांच्यावतीने तुकाराम राऊळ यांनी फित कापून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, डॉ. टिनशा महीजा, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, कलंबीस्त सरपंच सपना सावंत, मंगल देसाई, जीवन लाड, पंढरी राऊळ, गणू राऊळ, पांडुरंग पास्ते, रामचंद्र घावरे, विनायक सावंत, उमेश पाटील, शाहू पास्ते, संजू पालकर, उदय सावंत, गुणाजी राऊळ, चंद्रकांत राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र हे तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या हातून जनतेची चांगली सेवा घडो. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असून लवकरच आरोग्यमंत्र्यांनाही जिल्ह्यात घेऊन येणार आहे. या ठिकाणी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच उपकेंद्रांनाही ताकद दिली जाणार आहे. लवकरच डॉक्टरांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. सांगली पंचक्रोशीतील भागाचा विकासही केला जाणार आहे. आंबोलीत काश्मीरच्या धरतीवर विकास करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचतगटांना ताकद दिली जाणार आहे. या भागात प्राथमिक शाळांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन शाळा भक्कम करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. नवोदयप्रमाणे वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये दोन नवीन शाळा आणण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणात प्रथम क्रमांकावर असेल.’’
यावेळी कलंबिस्त सरपंच सावंत यांनी कलंबिस्त सातेरी मंदिरकडे जाणारा पूल वाहून गेला होता. त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. लवकरच यासंदर्भात निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पाणीटंचाई भासत असल्याने तेथे असलेली जुनी विहीर नव्याने बांधण्यासाठी दहा लाख रुपये आमदार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कलंबिस्त येथील एका वाडीला असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देण्याची सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------
चौकट
सह्याद्री पट्ट्याच्या विकासासाठी प्रयत्नशील
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘सह्याद्री पट्ट्याचा विकास व्हावा, यासाठी मी लक्ष घातलेला आहे. लवकरच सह्याद्री कोल्हापूर मार्ग पूर्णत्वास येणार आहे. पारपोली-कलंबीस्तला जोडलेला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातूनही पूर्ण केला जाणार आहे. केवळ पैसा आणि निधी दिला म्हणून विकास होत नाही तर आपल्या माणसात उपस्थित राहता आले पाहिजे. लवकरच मी साटेली, साटेली भेडशी आरोग्य केंद्रांना भेट देणार आहे.’’